BJP Vs NCP Activist Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Vs BJP : खंडाळ्यात गोरे-मकरंदआबांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा : ‘वोट चोर’ म्हटल्याने भाजपचे कार्यकर्ते अंगावर धावून गेले

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान खंडाळा मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 02 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. मात्र, खंडाळा मतदान केंद्रावर महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पाहून ‘वोट चोर’ म्हटल्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला नेल्याने पुढील गोष्टी टळल्या. पण खंडाळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी ९७. ९० टक्के मतदान झाले. कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले आहे. यातील खंडाळा मतदान केंद्रावर सोसायटी मतदारसंघाच्या मतदानादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

खंडाळा मतदारसंघात सोसायटी गटात ५०, तर इतर मतदारसंघासाठी ३८ असे एकूण ८८ मतदान होते. ते शंभर टक्के मतदान झाले. खंडाळ्यात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पक्षाकडून कडवे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे खंडाळ्याचे राजकीय वातावरण तापले आहे. त्याला जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संघर्षाची किनारही होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री मकरंद पाटील हे सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या ३० मतदारांसह केंद्रावर पोचले. मतदान केल्यानंतर ते परत गेले. त्यानंतर पावणे दोनच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते मतदानासाठी केंद्रावर दाखले. ते सर्वजण मतदानासाठी जात होते, त्या वेळी काहींनी भाजप मतदारांच्या दिशेने बघून ‘वोट चोर’ अशी टिपण्णी केली.

‘वोट चोर’ या टिपण्णीमुळे भाजप कार्यकर्ते चांगलेच भडकले. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याने तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने गेले. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. शब्दाला शब्द वाढत गेल्यामुळे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वातावरण काही वेळ तणावपूर्ण झाले होते. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील गोष्टी टळल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT