Udaysinh Patil Undalkar-Prithviraj Chavan-Atul Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politic's : प्रतिष्ठा पणाला लागणार पृथ्वीराजबाबा-अतुल भोसलेंची; पण उदयसिंह उंडाळकर, मनोहर शिंदे ठरणार किंगमेकर

Warunji ZP Group Vishleshan : कऱ्हाडच्या वारुंजी जिल्हा परिषद गटात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत होणार असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटासमोर अतुल भोसले गटाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar
  1. वारुंजी जिल्हा परिषद गटात पूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद वाढली आहे.

  2. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात फूट पडल्याने काँग्रेसला आपला गड राखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

  3. वारुंजी गट महिलांसाठी आरक्षित असल्याने भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून उंडाळकर गटाची भूमिका निर्णायक ठरू शकते.

Karad, 25 October : कऱ्हाड शहरालगत असलेल्या वारुंजी (ता. कऱ्हाड, जि. सातारा) जिल्हा परिषद गटावर आत्तापर्यंत कॉंग्रेसचे वर्चस्व होते. ते वर्चस्व टिकवण्याचे आव्हान कॉंग्रेसपुढे या वेळी असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर वारुंजी गटात आमदार डॉ. अतुल भोसले यांचा गट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक कॉंग्रेसजण भाजपवासी झाले आहेत, त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा यावेळी कस लागणार आहे.

वारुंजी गटात भाजप (BJP) विरुध्द कॉंग्रेस अशीच थेट लढत होईल, अशी चिन्हे आहेत. विजयासाठी मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरु शकते. कोयना वसाहत गण खुला झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. वारुंजी गणात अनुसूचित जातीचा प्रबळ उमेदवार शोधण्यासाठी नेत्यांनी फिल्डींग लावली आहे.

कराड तालुक्यातील मलकापूरला नगरपंचायत झाल्यानंतर वारुंजी जिल्हा परिषद गट हा वारुंजी आणि कोयना वसाहत गणासह नव्याने तयार झाला आहे. या गटावर सुरुवातीपासूनच कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि माजी सहकारमंत्री (स्व) विलासराव पाटील-उंडाळकर, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे दोन गट एकत्र आल्याने तसेच, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची त्या गटावर पकड असल्याने कॉंग्रेसला सहज यश मिळत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या गटातील चित्र बदलले आहे.

कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचे डॉ. अतुल भोसले आमदार झाल्यानंतर या गटावर त्यांचा प्रभाव वाढला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री चव्हाण गटातील कॉंग्रेसचे (Congress) समर्थक भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे या गटात भाजपची ताकद वाढली आहे. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असणारे ॲड. उदयसिंह उंडाळकर हे महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले आहेत. त्यामुळे पूर्वी एकसंघ असलेली कॉंग्रेस दुभंगली गेल्याने पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

वारुंजी गट सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांची पंचाईत झाली आहे. त्यातील काही इच्छुकांकडून आपल्या पत्नीला निवडणुकीला उतरवले जाऊ शकते. या गटातुन कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या पत्नी सुनंदा पाटील किंवा त्यांच्या सूनबाई डॉ. भाग्यश्री नयन पाटील यांची कॉंग्रेसकडून, तर आमदार डॉ. भोसले यांचे समर्थक, उद्योजक प्रमोद पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील या भाजपकडून इच्छुक आहेत.

तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव थोरात यांच्याकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र, या ठिकाणी भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होईल, अशी स्थिती आहे.

खुला असलेल्या कोयना वसाहत पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मूळचे कॉंग्रेसचे आणि सध्या भाजपवासी झालेले नरेंद्र नांगरे-पाटील, पंकज पाटील यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. कॉंग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. येथूनअशोकराव थोरात यांच्याकडूनही अचानक एखादे नाव पुढे येऊ शकते. वारुंजी गण अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. कॉंग्रेसकडून रवींद्र बडेकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, भाजपला अजूनही तगडाउमेदवार मिळालेला नाही.

अभिजीत पाटील भाजपमध्ये जाणार?

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्याबरोबर युवक कॉंग्रेसमध्ये सक्रीय असलेले उद्योजक अभिजीत पाटील यांचेही नाव त्या गणातून चर्चेत आहे. मात्र ते कॉंग्रेसमध्ये राहतील की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. ते भाजमध्ये प्रवेश करुन उमेदवारी घेतील, असेही सांगितले जात आहे. अभिजीत पाटील यांनी मागील निवडणुकीत मोठे कष्ट घेऊन त्यांचे चुलते उत्तम पाटील यांना पंचायत समितीला कोयना वसाहत गणातून निवडून आणले होते. त्यांचाही गट येथे सक्रीय आहे.

उंडाळकर गटाची भूमिका महत्वाची ठरणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा प्रबळ गट या मतदारसंघात कार्यरत आहे. मागील सर्व निवडणुकीत ते कॉंग्रेससोबत असल्याने आत्तापर्यत सर्वच निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळाले. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असून भाजपनेही तेथे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे तेथे कॉंग्रेसला आपला गड राखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. वारुंजी गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड. उंडाळकर गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Q1. वारुंजी जिल्हा परिषद गटात कोणते दोन प्रमुख पक्ष आमने-सामने आहेत?
A1. वारुंजी गटात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.

Q2. डॉ. अतुल भोसले यांचा प्रभाव का वाढला आहे?
A2. ते कराड उत्तर मतदारसंघातून भाजप आमदार झाल्याने त्यांचा प्रभाव वाढला आहे.

Q3. वारुंजी गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे?
A3. हा गट सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे.

Q4. या निवडणुकीत कोणत्या गटाची भूमिका निर्णायक ठरू शकते?
A4. राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाची भूमिका निर्णायक ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT