प्रमिला चोरगी
सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नुकतेच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात स्वागतासाठी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी आवर्जून उपस्थित होते. मात्र, पक्षाचे निष्ठावंत आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) दिवसभर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. अखेर रात्रीच्या ‘लेझर शो’च्या उदघाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यासाठी बऱ्याच घडामोडी घडाव्या लागल्या. (MLA Vijay Kumar Deshmukh was absent during Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil's visit)
भाजपचे निष्ठावंत आमदार म्हणून ओळख असलेले आमदार देशमुख पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात कुठेही सहभागी नसल्याने पक्षातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवला. भाजपचे पालकमंत्री म्हणून नेत्यांविषयी जो आपुलकीचा ओलावा अपेक्षित होता. तो ना भाजपच्या नेत्यांमध्ये होता, ना कार्यकर्त्यांमध्ये. दिवसभराच्या दौऱ्यात जिल्ह्यातील ढिगभर नेते पालकमंत्र्यांच्या अवती-भवती होते. मात्र, निष्ठावंत कुठेही दिसले नाहीत.
राज्यात सत्तांतरानंतर तब्बल महिनाभरानंतर मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. या विस्तारात महसूल मंत्रीपद मिळालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्चशिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. विखे पाटील यांच्याकडे २४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यानंतर ते ४ ऑक्टोबर रोजी ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.
पालकमंत्र्यांचा पहिलाच दौरा असल्याने पक्षाचे आमदार त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा फोल ठरली. कारण विखेंच्या स्वागताला आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. मात्र, भाजपचे निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार देशमुख मात्र गैरहजर हेाते. त्यांची गैरहजेरी पटकन लक्षात येणारी होती. सोलापूर शहरात असूनही त्यांनी शेवटपर्यंत पालकमंत्र्यांसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. अखेर दुपारी पालकमंत्री विखे यांनी देशमुख यांच्या घरी भेट दिली. त्या भेटीचा तपशील कळू शकला नाही. मात्र, त्यानंतर रात्री झालेल्या ‘लेझर शो’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा विखे यांनी हेरिटेजमधील बैठकीत व्यक्त केली. त्याच व्यासपीठावर गेली वीस वर्षे शहरात भाजपचे अस्तित्व टिकवून ठेवणारे, निष्ठावंत आमदार विजयकुमार देशमुख सोलापुरात असूनही नव्हते, हा विरोधाभास पाहायला मिळाला. आगामी निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचा झेंडा फडकाविणाऱ्यांची संपूर्ण फौज दौऱ्यात असली तरी महापालिका, बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या भाजपच्या नेत्याला डावलून ते शक्य आहे का? भाजप जिल्ह्यात मोठा पक्ष म्हणून ओळखला जात असताना समन्वयाचा अभावदेखील तितक्याच प्रखरतेने दिसून येत आहे.
सत्तेमुळे इतर पक्षातून अनेक नेते भाजपत आले. त्या नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे-पाटील एक आहेत. भाजपमध्ये कोणत्याही पदावर नियुक्ती करताना पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो. मग काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले शिर्डीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला थेट सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करणे, हे भाजपच्या कोणत्या तत्त्वात बसले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.