Vijaysinh Mohite Patil -Sharad Pawar
Vijaysinh Mohite Patil -Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

VijayDada Meet Pawar : विजयदादा बारामतीत जाऊन शरद पवारांना भेटले....

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे तब्बल दोन ते अडीच वर्षांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) भाजपमध्ये (BJP) गेलेले विजयदादा मोठ्या कालखंडानंतर पवारांसोबत ते चक्क बारामतीत दिसून आले. त्याची राज्याच्या राजकीय वर्तुळातून चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर विजयदादा काहीसे अडगळीत पडल्याचे सध्याचे चित्र आहे. (Vijaysinh Mohite Patil meet Sharad Pawar in Baramati)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीवर रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावर विजयदादांची हजेरी होती. त्यानंतर ३ जुलै २०२० रोजी विजयसिंह मोहिते पाटील यांची भाजपच्या केंद्रीय समितीवर विशेष निमंत्रित म्हणून निवड झाली होती. त्यानंतर ते भाजपचे अधिकृत सदस्य बनले. तेव्हापासून ते पवारांपासून चार हात लांब होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मोहिते पाटील हे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेचे ते प्रमुख घटक होते. मात्र, भाजपत प्रवेश केल्यापासून ते मुख्य राजकीय प्रवाहापासून जरा लांब गेल्याचे चित्र होते. भाजप प्रवेशानंतर राज्यसभेपासून राज्यपालपदापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र, कायम सत्तेच्या वर्तुळात असलेले दादा राजकीय अडगळीत पडल्याचे चित्र आहे.

दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विजयसिंह मोहिते पाटील हे अजीवन सदस्य आहेत, त्यामुळे ते या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला कायम उपस्थित असतात. वसंतदादा शुगरच्या वार्षिक सभेनंतर विजयदादा हे बारामतीत शरद पवार यांच्यासोबत दिसून आले. बारामती कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात एकाच गाडीत एकाच सीटवर असून या दोघांनी प्रदर्शनातील स्टॉलची तसेच कृषी उत्पादने, नवनवे प्रयोग याची पाहणी केली. या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली काही नाही, याचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT