Vikram Sawant-Prakash Jamdade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदमांच्या मावसभावाचा पराभव घडवत जगतापांनी मुलाच्या पराभवाचा हिशेब चुकता केला

गेल्या निवडणुकीत जगतापांच्या मुलाचा, मनोज यांचा पराभव विक्रम सावंत यांनी केला होता.

सरकारनामा ब्यूरो

बादल सर्जे

जत (जि. सांगली) : सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत विकास सोसायटी गटात सर्वात धक्कादायक निकाल लागला. राज्यमंत्री विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांचे मावसभाऊ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव करत प्रकाश जमदाडे (Prakash Jamdade) यांनी खळबळ उडवून दिली. जमदाडे मूळचे भाजपचे, ते गेले राष्ट्रवादीत. तेथे राहून त्यांनी भाजपच्या पॅनेलची उमेदवारी घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या मैत्रीच्या बेरजेवर काँग्रेसला धक्का दिला. (Vilasrao Jagtap avenged the boy's defeat by defeating Vikram Sawant)

जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत बंदूक प्रकाश जमदाडे यांच्या खांद्यावर होती. माजी आमदार विलासराव जगताप यांनी निशाणा साधला होता. पण, त्या बंदुकीत गोळाबारूद कुणाचा होता, हा प्रश्‍न मात्र गुलदस्त्यातच राहिला आहे. गेल्या निवडणुकीत जगतापांच्या मुलाचा, मनोज यांचा पराभव विक्रम सावंत यांनी केला होता. तो हिशेब आज जगतापांनी पूर्ण केला.

प्रकाश जमदाडे हे जत तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेते. पूर्वी ते जगतापांचे कट्टर समर्थक होते. जगताप राष्ट्रवादीत असताना सांगली बाजार समितीत काँग्रेसची सत्ता पलटून टाकण्यात जमदाडे आघाडीवर होते. जयंतरावांच्या नेतृत्वाखाली तेथे सत्तांतर झाले होते. त्याचे बक्षीस म्हणून जगताप यांनी जमदाडे यांना सभापतिपद दिले. जगताप हे २०१४ मध्ये भाजपमध्ये गेले, सोबत जमदाडेही गेले. त्याचवर्षी जगताप आमदार झाले. पुढे काही वर्षात जमदाडे यांना विधानसभा लढवावी, असे वाटू लागले. त्यांनी भाजपमध्ये राहूनच जगतापांशी अंतर वाढवले. खासदार संजय पाटील यांना नेता मानले. डिजिटल फलकावर फक्त संजयकाकांचा फोटो असायचा. संजयकाकांनीही त्यांना रेल्वे बोर्डाचे संचालक केले. विलासराव जगतापांना ते मात्र आवडले नाही. त्यांनी संजयकाकांना समजावले, मात्र सिलसिला सुरु राहिला. पुढे २०१९ मध्ये जगताप यांच्या विधानसभा पराभवाच्या काही कारणांपैकी हे एक कारण ठरले होते. जगताप आणि संजयकाकांमध्ये दुरावा येण्यास जमदाडे काहीअंशी कारणीभूत ठरले होते.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जमदाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. आता जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि दुरावलेले जमदाडे जगतापांचा सलग दोन पराभवांचा बदला पूर्ण करण्यासाठीचे उमेदवार ठरले होते. सावंत यांच्या विरोधात भाजपच्या पॅनेलमधून लढायला राष्ट्रवादीतून जमदाडे आयात केले गेले. ही बंडखोरी होती की ‘करेक्ट’ नियोजन, हे गुलदस्त्यातच राहिले. जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजपची मैत्री आहे. काँग्रेस तिला अनैसर्गिक म्हणते, मात्र ती रिझल्ट देणारी ठरते. विक्रम सावंत यांचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी ही मैत्री या वेळी कामाला लागली. त्याआधीच काँग्रेसने जतमधील राष्ट्रवादीच्या भाजपसोबत सलगीबाबत थेट प्रदेश नेत्यांकडे तक्रार केली होती. त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे जमदाडे भाजपच्या विमानातून जिल्हा बँकेत पोचले, हे मात्र खरे.

राष्ट्रवादीचा भाजपशी सलोखा कायम

सांगली जिल्हा बँकेच्या खेळात जमदाडे यांच्या मागे मोठी ताकद उभी राहिली. सावंत यांच्याविरोधात ८५ मतांचा खेळ करताना ‘गोळा बारूद’ महत्वाचा होताच. निवडणूक वरवर दिसते तेवढी सोपी झाली नाही. मैदान जतचे होते, मात्र पट अनेकांचे काढले गेले. राष्ट्रवादीला राज्यातील महाविकास आघाडीच्या धोरणांची आठवण करून देण्यापर्यंत सारे घडले. त्यानंतरही राष्ट्रवादीने भाजपशी सलोखा कायम ठेवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT