Parli Peoples Andolan
Parli Peoples Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शाळा शिकू का शेत राखू... परळी खोऱ्यातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा

Umesh Bambare-Patil

Satara News : परळी खोऱ्याच्या काही भागात वन्य प्राण्यांचा सुळसुळाट झाला असून त्यातून शेतीची मोठ्याप्रमाणात हानी होत आहे. या प्रकरणी शासनाला जागे करण्यासाठी आज परळी खोऱ्यातील ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले Raju Bhosale यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय व वनभवनावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात लहान मुले, शालेय विद्यार्थ्यांसह हजारो शेतकरी, महिला सहभागी झाले होते. आंदोलकांनी शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी परळी खोऱ्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले. निवेदनात म्हटले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयना अभयारण्यालगतच्या सह्याद्रीच्या कडे कपारीतील गावांना मोठ्याप्रमाणात वन्य प्राण्यांचा त्रास सोसावा लागत आहे. याची झळ आता लगतच्या सखल भागातील बागायती शेती असलेल्या गावांनाही बसत आहे.

वन्य प्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असुन त्यांच्या राखीव क्षेत्रात पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने ते लोकवस्तीकडे वळु लागले आहेत. रात्र दिवस शेतीची राखण करूनही वन्यप्राणी एका रात्री शेती फस्त करत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात आहे. रानगव्यांचा सुळसुळाट सुरू असुन त्यांच्याकडुन शेती भुईसपाट होत आहे.

यासोबतच रानडुक्कर, साळींदर, मोर, ससे, माकडे, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचाही त्रास वाढला आहे. शेतकरी मेटाकुटीला आला असून शेती संभाळायची की वन्य प्राणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील ग्रामस्थांनी आपल्या व्यथाआज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मांडल्या. पोवई नाक्यावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व वनभवनावर गेला. या मोर्चात परळी खोऱ्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

शाळा शिकू का शेत राखू...

या भागातील विविध शाळांतील दीडशे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. शाळा शिकू का शेत राखू... अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. पर्यटन पूरक व्यवसायांना परवानगी द्या, शेती उध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांना वार्षिक मोबदला मिळावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने द्या, आदी मागण्यायावेळी करण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT