Raju Shetti, Vinay Kore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Vs Vinay Kore : सांगली, हातकणंगलेत 'जनसुराज्य'ची शक्ती निर्णायक; राजू शेट्टींपुढे विनय कोरेंचे आव्हान

Sangli, Hatkanangle Lok Sabha : शिराळा, वाळवा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये कोरेंचे जनमत

Rahul Gadkar

Kolhapur Political News : एकेकाळी जिल्ह्यात तीन आमदार, महापालिकेवर सत्ता असणाऱ्या जनसुराज्य शक्तीचा प्रभाव आता कमी झाला आहे. मात्र, भाजपसोबत संधान बांधल्याने जनसुराज्य शक्तीला नवे बळ मिळाले आहे. मध्यंतरीच्या काळात जनसुराज्य शक्तीचे आमदार व माजी मंत्री विनय कोरे यांना काही अडचणी सहन कराव्या लागल्या. कोरेंच्या नेतृत्वातील वारणेचा विस्तार आगामी विधानसभेतील त्यांच्या विजयाची खात्री देत आहे. तसेच लोकसभेत खासदार धैर्यशील माने यांच्यासाठीही त्यांची भूमिका निर्णायक असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

एकेकाळी कोल्हापुरातील एका पक्षाचा राज्यातील राजकारणात दबदबा होता. जिल्ह्यात पन्हाळा-शाहूवाडीमधून जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष विनय कोरे, हातकणंगलेतून माजी आमदार राजीव आवळे आणि चंदगड विधानसभामधून नरसिंह गुरुनाथ हे विधानसभेचे सदस्य होते, तर 2005 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्तेत असणारी कोरे यांची जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद आजच्या एका आमदारावर आली आहे.

जनसुराज्यने आघाडीच्या काळात ऊर्जामंत्री पदापर्यंत मजल मारली होती. मात्र, 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून पन्हाळा-शाहूवाडीतून सत्यजीत पाटील-सरुडकर हे विधानसभा सदस्य झाले. त्यानंतर फक्त वारणा शेतकरी संघाच्या माध्यमातून आपला प्रभाव मतदारसंघावर ठेवला होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या सत्यजीत सरुडकर यांचा पराभव करून विनय कोरे यांनी विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षांच्या काळात जनसुराज्यची झालेली पीछेहाट पाहता पक्षीय हात बळकट करण्यासाठी विनय कोरे यांचे प्रयत्न राहिले. मंत्रिमंडळ विस्तारात विनय कोरे यांचे नाव असल्याच्या चर्चाही जिल्ह्यात सुरू होत्या, पण महाविकास आघाडीने त्यावर पाणी फिरवले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित सत्ता स्थापन केली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर मात्र भाजपने सत्ता स्थापन केली. त्याला राष्ट्रवादीचीही साथ मिळाली. सध्या जनसुराज्य पक्ष ही सत्तेतील वाटेकरी आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचेही नाव येण्याची शक्यता आहे.

सांगली आणि हातकणंगले मतदारसंघावर प्रभाव

महाराष्ट्रात स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकाराचा पाया रोवला. त्याची सुरुवात वारणा येथून केली. आजच्या घडीला सहकार क्षेत्रात वारणा शेतकरी संघ महत्त्वाचा मानला जातो. तात्यासाहेब कोरे यांच्यानंतर वारणा समूहाची जबाबदारी आमदार विनय कोरे यांच्याकडे आली. त्या माध्यमातून कोरे यांचा पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात जनसंपर्क आहे, तर सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, जत, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यांतही कोरेंचा दबदबा आहे.

एकट्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर शिराळा, वाळवा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जनमत कोरे यांच्या बाजूने आहे, तर सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये चार तालुक्यात वारणेच्या माध्यमातून गट महत्त्वाचे आहेत. वारणा दूध संघाच्या माध्यमातून या तालुक्यांत असणारा संपर्क हा लोकसभेच्या दृष्टीने जनसुराज्य पक्षाला महत्त्वाचा आहे. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या मदतीला जनसुराज्य पक्ष ऐनवेळी धावून गेल्याचा दावा केला जातो.

राजू शेट्टींच्या अडचणीत वाढ?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणूक ही महायुती विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे धैर्यशील माने या ठिकाणी विजयी झाले. आता आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असणार आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर या लोकसभा मतदारसंघातील सहानुभूती शेतकरी संघटना किंवा महाविकास आघाडीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. या परिस्थितीत शिरोळ, हातकणंगले आणि शाहूवाडी सोडली तर शेतकरी संघटनेला इतर तालुक्यात जनमत कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तालुक्यात जनस्वराज्यची शक्ती युतीच्या बाजूने राहिल्यास त्याचा फटका शेट्टींना बसण्याची शक्यता आहे.

शेट्टींचे बेरजेचे राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घेताना दिसत आहेत. मात्र, शेकापचे आमदार जयंत पाटील हे प्राकृतिक विकास मंच हा इंडिया आघाडीतीलच एक भाग आहेत, असे सांगतात. आघाडीत आपले महत्त्व वाढवण्यासाठीच राजू शेट्टी यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. मात्र, ऐनवेळी इंडिया आघाडी ही जागा प्रागतिक विकास मंचला देण्याच्या तयारीत आहे. वास्तविक पाहता शेट्टी यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवल्यास काही अजातशत्रूंची त्यांना मदत होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT