Dhananjay Mahadik-Bhagirath Bhalke
Dhananjay Mahadik-Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोठी बातमी : भगिरथ भालकेंचे बैठकीसाठी भाजपच्या धनंजय महाडिकांना निमंत्रण!

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षे लांबणीवर पडलेली पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Vitthal Sugar Factory) अखेर आज (ता. ३१ मे) जाहीर झाली आहे. कारखान्यासाठी ५ जुलै रोजी मतदान होणार असून ६ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी राजकीय नेतेमंडळींना निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली होती. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) गटाने विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) आणि भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना २ जुलै रोजीच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे, त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे विठ्ठल परिवाराचे लक्ष लागले आहे. (Vitthal Factory: Bhagirath Bhalke invites Dhananjay Mahadik to election meeting)

विठ्ठलची ही निवडणूक कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांना डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि कारखान्याचे संचालक युवराज पाटील हे आव्हान देणार आहेत, त्यामुळे दोन्ही पाटलांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तालुका पिंजून काढला आहे.

दरम्यान, ता. २ जुलै रोजी भालके, काळे गटाच्या कार्यकर्त्यांची पहिली बैठक बोलवली आहे. या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका मांडतात, याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांची भूमिका अत्यंत महत्वाची व निर्णायकी ठरणारी आहे. काळे यांनी अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मध्यंतरी कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतरही कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

दरम्यान, येत्या २ जुलै रोजी भगीरथ भालके यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे व राज्यसभेचे भाजपचे उमेदवार तथा भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडीक यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. या बैठकीसाठी काळे-महाडिक उपस्थित राहणार का, उपस्थित राहिले तरी काय भूमिका घेतात, याकडेच विठ्ठल आणि भीमा परिवाराचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर तालुक्यात भीमा परिवाराच्या माध्यमातून धनंजय महाडिक हे सक्रीय आहेत. त्यांची तालुक्यातील सहकार क्षेत्रात बऱ्यापैकी ताकद आहे. परिचारक-राजन पाटील यांच्या ताब्यात असलेला भीमा सहकारी साखर कारखाना त्यांनी भीमा परिवाराच्या माध्यमातूनच जिंकून दाखवला आहे, त्यामुळे त्यांना मानणारे कार्यकर्ते तालुक्यात आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भालके गटाकडून होताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT