Sahkar Shiromani Sugar factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sahkar Shiromani Election : सहकार शिरोमणी काळेंकडेच राहणार की अभिजीत पाटील बाजी मारणार? सभासद उद्या करणार फैसला...

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Politic's : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. १६ जून) मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ३९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. (Voting in Pandharpur tomorrow (June 16) for Sahkar Shiromani factory)

सहकार शिरोमणी कारखान्यासाठी सत्ताधारी कल्याणराव काळे (Kalyanrao kale) यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, डॉ. बी. पी. रोंगे अॅड. दीपक पवार यांनी एकत्रित येत आव्हान उभे केले आहे. सहकार शिरोमणी साखर कारखाना (Sugar Factory) कोणाच्या ताब्यात जाणार हे उद्या शेतकरी सभासद ठरविणार आहेत.

मतदानाच्या (Voting) दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या साठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या एकूण २१ जागांपैकी २० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. कारखान्याच्या सहकारी संस्था मतदारसंघातून मालन वसंतराव काळे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित २० जागांसाठी उद्या सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे.

निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष

या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील डॉक्टर बीपी रोंगे अॅड. दीपक पवार यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही गटांनी जोरदार प्रचार करून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. मतदानादरम्यान सभासद कोणाच्या बाजूने कौल देणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सभासद पळवापळवीचा आरोप

सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी (ता. १४) संध्याकाळी थंडावल्या. अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्या अस्तित्वाची तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक समजली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी‌ काळे गटाकडून सभासदांना दमदाटी करून पळवा-पळवी केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे शेंडगेवाडी येथे थकीत ऊसबिलासाठी सभासदांनी कल्याणराव काळे यांची गाडी अडवल्याची घटना घडल्याची चर्चा आहे.

या निवडणुकीनिमित्त तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या निवडणूक प्रचाराची पातळी खालावल्याचे दिसून आले. दोन्ही गटाकडून अरे तुरेची भाषा ही वापरण्यात आली. एकूणच या निवडणुकीमध्ये चुरस असल्याचे दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे.

सत्ताधारी काळे गटाच्या विरोधात थकीत ऊस बिलामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे शेवटपर्यंत दिसून आले. सभासदांची नाराजी दूर करण्याचा कल्याणराव काळे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. उर्वरित दोन दिवसांमध्ये ते कशा पद्धतीने सभासदांची नाराजी दूर करतात, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने काळे गटाने ही जोरदार तयारी केली आहे. कोणताही दगा फटका बसू नये यासाठी सभासदांची जमवाजमव केल्याची चर्चा सुरू आहे. अशातच काळे गटाने रांजणी येथील २५ सभासदांना कर्नाटकातील गोकर्ण येथे देवदर्शनासाठी नेण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. तशी त्यांनी पोलिसात तक्रार ही दिली आहे.

त्या तक्रारीवर काळे गटाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोणत्याही सभासदाला पळवून नेले नाही. रांझणीचे सभासद स्वखुशीने देवदर्शनाला गेले आहेत. या उलट या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांच्या पॅनेलचा विजय व्हावा यासाठी आम्ही गोकर्ण येथे अभिषेक करण्यासाठी आलो आहे, असे रांजणी येथील काळे गटाचे कार्यकर्ते श्री दांडगे यांनी सांगितले. १६ जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून १८ जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीदरम्यान तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT