Ajit Pawar in Meeting
Ajit Pawar in Meeting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जावळीतील 54 गावांचा पाणीप्रश्न सुटणार; बोंडारवाडीला निधी देणार... अजित पवार

Umesh Bambare-Patil

मुंबई : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित आहे. जावळी तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे सदरचे धरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे, असे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक आहे, असे नमुद केले. यावर धरणाच्या पुर्ततेसाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने आवश्यक कार्यवाही करावी. धरणासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. सर्व्हेक्षणसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने धरणाचे सर्व्हेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत माहिती देतानाच प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आणि भविष्यात करावयाच्या कामाबाबत माहिती दिली.

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभाग प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, विशेष कार्यकारी अधिकारी सी. आर. गजभिये आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT