Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आम्ही काय बांगड्या घालून स्वस्थ बसणार नाही

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) - अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क मंत्री म्हणून राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) जिल्ह्यात शिव संवाद कार्यक्रम घेत आहेत. या कार्यक्रमातून ते जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करत आहेत. आज सोनई ( ता. नेवासे ) येथे शिव संवाद कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. ( We don't wear bracelets )

घोडेगाव (ता.नेवासे) येथे नऊ कोटी 35 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. घोडेगाव पाणीयोजनेसाठी 44 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. आंबराई विश्रामगृह येथे झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी केले. मान्यवरांचा सत्कार रावसाहेब कांगुणे, डॉ. शिवाजी शिंदे, मच्छिंद्र म्हस्के, हरिभाऊ शेळके यांनी केला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते, रामदास भोसले उपस्थित होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सध्या फक्त महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या चौकश्या सुरू आहेत. भारतीय जनता पक्षातील सारेच जणू महामंडलेश्वर असल्या प्रमाणे वागत शिवसेनेला लक्ष्य करणार असतील तर आम्ही काय बांगड्या घालून स्वस्थ बसणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा केलेला अपमान प्रत्येकाच्या जिव्हारी लागणारा आहे. 'कोरोना' काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चांगले काम केल्यानेच पहिल्या पाच मध्ये राज्याचे नाव आहे. असे सांगून त्यांनी चांगल्या कामाला भाजपची लागलेली साडेसाती हटू दे अशी प्रार्थना शनिदेवाला केली असल्याचे सांगितले.

जलसंधारण मंत्री गडाख यांनी जिल्ह्यात राबविलेल्या शिवसंवाद व घोंगडी बैठकीची माहिती देवून जलसंधारण, दळणवळण व आरोग्य मंदीराचे काम करताना संघटना वाढीला अग्रक्रम दिला जाईल असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील 1100 बंधाऱ्यांसाठी 250 कोटीचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. शिवसंवाद मध्ये मंत्री पाटील यांनी पक्ष वाढण्यासाठी मार्गदर्शन केले. नेवासे तालुक्यासह जिल्ह्यात नळपाणी पुरवठा योजनेला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत त्यांनी आपल्या भाषणाला अस्सल खानदेशी तडका देत उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT