Rajan Patil-Sunil Tatkare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil : राजन पाटलांना न्याय देण्यात आम्ही कमी पडलो; सुनील तटकरेंची जाहीर सभेत कबुली

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 September : मोहोळ मतदारसंघ राखीव होऊनही माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार सलग तीन निवडणुकांमधून निवडून आणला आहे, अशी कामगिरी करणारे ते एकमेव नेते आहेत. पण मला याही गोष्टीची खंत आहे की पक्षाला प्रचंड ताकद देऊनसुद्धा राजन पाटलांना न्याय देण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मोहोळमध्ये आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. या वेळी व्यासपीठावर आमदार यशवंत माने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार राजन पाटील आदी उपस्थित होते.

खासदार तटकरे म्हणाले, राजन पाटील (Rajan Patil) यांनी मोहोळ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. हा मतदारसंघ 2009 मध्ये आरक्षित झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात असे मोजके मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघातून सातत्याने एकाच पक्षाचा लोकप्रतिनिधी निवडून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आजही आभार मानतो. तसेच 2014 मध्ये सुद्धा मीच पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यावेळी माझ्याच सहीचा एबी फार्म दिला होता.

राजन पाटील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद टिकवून तर ठेवलीच. पण, घड्याळाच्या चिन्हावर सलग तीन वेळा पक्षाचा आमदार निवडून आणला आहे. मला याही गोष्टीची खंत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड ताकद देऊनसुद्धा राजन पाटलांना न्याय देण्याबाबत आम्ही कमी पडलो. त्या वेळचं राजकारण कदाचित वेगळं असेल.

पण, राजकारणातील समीकरणे झपाट्याने बदलत असतात. बदलेल्या राजकारणामुळेच यशवंत माने यांनी जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा निधी मोहोळ मतदारसंघात आणू शकले आहेत, असा दावाही तटकरे यांनी केला.

तुमच्या मनात अनेक गोष्टी आहेत. एखादा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर कर्तृत्ववान माणसाला संधी मिळत नसते. पण, आता आमची जबाबदारी आहे. माझ्यावर ती अधिक जबाबदारी येते. राजन पाटील यांना योग्य पद्धतीने सन्मान देण्याचे काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के घडेल, असा शब्द सुनील तटकरे यांनी या मेळाव्यातून दिला.

बाळराजेंच्या नेतृत्वाचे केले कौतुक

बाळराजे ऊर्फ विक्रांत पाटील हे मोहोळ परिसरातील शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारे नेतृत्व आहे. ज्या पोटतिडकीने त्यांनी प्रश्न मांडले, ते या भागातील उद्याचे नेतृत्व कशा पद्धतीने काम करतंय, याची ती झलक होती. राज्यात तरुण नेतृत्वाची फळी उभी करण्याचे काम अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामध्ये आमचा हा मोहोळचा तरुण उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात शंभर टक्के पाहायला मिळेल, असा शब्दही सुनील तटकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT