Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे दोन खासदार निवडून आणायचे आहेत : जयंत पाटलांनी फुंकले रणशिंग

सरकारनामा ब्यूरो

चंदगड (जि. कोल्हापूर) : ‘‘(स्व.) बाबासाहेब कुपेकर यांच्यानंतर संध्याताई कुपेकर आणि आमदार राजेश पाटील यांच्या रूपाने चंदगडच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार विधानसभेत निवडून दिले आहेत. मात्र, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात लोकसभेला तशी परिस्थिती नाही. एकेकाळी आपल्या विचारांचे दोन खासदार (mp) या भागातून होते. आता आपल्याला तेच दिवस पुन्हा आणायचे आहेत,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. (We want to get two NCP MPs elected from Kolhapur : Jayant Patil)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. २२ एप्रिल) चंदगड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यात जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्याला दोन खासदार निवडून आणायचे आहेत. मात्र, कोणत्याही निवडणुकीचे यश हे बूथ कमिट्यांमध्ये असते. त्यामुळे आपल्याला बूथ कमिट्यांवर लक्ष द्यावे लागेल. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी बूथ सदस्यांच्या माध्यमातून काम व्हायला हवे. बुथवर आपला वावर असेल तरच लोक आपल्या बाजूने उभे राहतील. तुम्ही पक्ष संघटना मजबूत करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश आले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करा.

केंद्रीय सत्ताधीशांकडे सोशल मीडियाची मोठी यंत्रणा आहे. खोटी बातमी पसरवण्यासाठी पगारावर माणसं ठेवली आहेत. आपण आपल्याला पारंपारिक पद्धतीने प्रचार करू, ती म्हणजे बूथ कमिटी. मागच्या काही दिवसांत पेट्रोलचे दर १० रुपयांनी वाढले आहेत. महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यावर कोणीच काही बोलत नाही. देशात चर्चा होते ती जातीयवादावर, भोंग्यांवर. पण मूळ प्रश्नांकडे कोणीच लक्ष देत नाही हे दुर्दैवी आहे, या कडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आहेरीपासून सुरू झालेली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आता चंदगड मतदारसंघात पोचली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीला गती देण्यासाठी या यात्रेने संपूर्ण राज्याची परिक्रमा केली आहे. आता जबाबदारी आपली आहे. पक्षाच्या कार्यक्रमात हजर राहणे, विविध बैठका घेणे, संघटनेला चालना देण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. इथल्या सामाजिक समस्या आहेत, त्या समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम आम्ही करू, कार्यकर्त्यांनी ते लोकांपर्यत नेण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा या मतदारसंघाला नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. प्रांताध्यक्ष आल्याने कार्यकर्त्यांना एक चैतन्य मिळाले आहे. जयंत पाटील यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्या कारकिर्दीत उचंगीसारख्या प्रकल्पांना गती मिळाली आणि या भागाला पाण्याची सुविधा उपलब्ध झाली. हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच, विविध विकासकामे केली आहेत. त्यामुळे या भागाचा विकास होत आहे, याबद्दल आमदार राजेश पाटील यांनी आभार मानले. आम्हाला संघटनेकडे लक्ष देता आले नाही. मात्र यापुढे आम्ही पक्ष बांधणीसाठी कामाला लागू. जो विचार घेऊन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी हा दौरा काढला आहे, त्याला यशस्वी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

(स्व.) बाबासाहेब कुपेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भागात वाढवला, त्यामुळेच आजपर्यंत आम्ही ही जागा राखली आहे. प्रदेशाध्यक्ष आल्याने पक्षाच्या कामाला आणखी ऊर्जा मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष इथल्या संघटनेला एक दिशा देतील आणि राष्ट्रवादी इथे आणखी वाढेल, अशा विश्वास माजी आमदार संध्याताई कुपेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. व्हाय. पाटील, केडीडी संचालक संतोष पाटील, अमरसिंह चव्हाण, प्रविण वाटिगी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, चंदगड विधानसभा अध्यक्ष रामाप्पाणा करीगार, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, चंदगड अध्यक्ष भिकाजी गावडे, आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, वैशाली पाटील, मनिषा तेली, मुन्ना नायकवडी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT