नवी दिल्ली - दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी त्यांच्या भाषणातून कोरोना उपाययोजनां संदर्भात महाराष्ट्र व महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला, असे ते म्हणाले होते. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ( What Prime Minister Modi said about Maharashtra is sad )
सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्राचा 'सुपरस्प्रेडर' असा केला. हा उल्लेख धक्कादायक आहे. त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राची लेक आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून मी त्यांना प्रश्न विचारतेय की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य का केलं? असा सवाल खासदार सुळे यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, "कोरोनाच्या काळात लोकांनी एकमेकांना मदत केली. माणूसकीचे दर्शन घडविले. पंतप्रधान मोदींवर मी नाराज नाही तर त्याच्या वक्तव्याने मला आश्चर्य वाटले. तुम्ही आज माझ्या महाराष्ट्राबद्दल आम्ही सुपस्प्रेडर आहोत असं विधान का केलं. महाराष्ट्राची लेक म्हणून मी आज तुमच्याकडे न्याय मागत आहे.
महाराष्ट्रातील जनतेने भाजपचे 18 खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यात मोलाचे योगदान दिले. मोदींनी महाराष्ट्रावर अशा प्रकारे केलेले आरोप हे दुर्दैवी आहेत. त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा हा अपमान आहे. देशातील वाढली महागाई, बेरोजगारी, कोरोना या स्थितीबाबत एक 'स्टेटसमन' म्हणून प्रधानमंत्री काहीतरी आश्वासकपणे बोलतील, त्यांच्या भाषणातून देशाला दिशा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र भाषणादरम्यान ते आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते खुप दुःखद आहे. ज्या राज्याने भाजपला 18 खासदार निवडून दिले. त्यांना प्रधानमंत्री करण्यात महाराष्ट्राच्याही मतदारांचाही मोलाचा हात आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान त्यांनी कोविड सुपरस्प्रेडर म्हणून केला. हे धक्कादायक आहे", असेही त्यांनी सांगितले.
एकदा निवडून आले की ते देशाचे प्रधानमंत्री असतात. हे पद या देशातील सर्वात महत्वाचे आहे. पण ते एका राज्याच्या वतीने बोलत होते. हे दुर्दैवी आहे, अशी टिपण्णी करुन सुप्रिया सुळेंनी कोरोना काळातील श्रमिक ट्रेन्सची आकडेवारीच सादर केली. याशिवाय तत्कालिन रेल्वेमंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीटस्, विधाने आणि पत्रव्यवहार यांचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. त्या म्हणाल्या की " महाराष्ट्र सरकार फारतर एसटी बस किंवा खासगी वाहन सुविधा उपलब्ध करुन देऊ शकते. रेल्वेची सुविधा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. कोरोना काळात गुजराजमधून 1033 तर महाराष्ट्रातून 817 श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या होत्या. रेल्वे केंद्र सरकार चालविते, महाराष्ट्र नाही, त्यामुळे जेंव्हा प्रधानमंत्री सांगतात की महाराष्ट्राने कोविड पसरविला तेंव्हा मला याची आठवण करुन द्यावी लागेल की आम्ही रेल्वे देऊ शकत नाही,"
त्या पुढे म्हणाल्या की, "पियुष गोयल हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी 24 मे रोजी पाच ट्वीट केले आहेत. त्यामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उद्देशून म्हणत आहेत की आम्ही 125 श्रमिक ट्रेन्स पाठवित आहोत. यासंदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिले आहे.हा पुरावा आहे. मी हे बोलतेय कारण प्रधानमंत्री महाराष्ट्राला लक्ष्य करुन बोलत आहेत. हे वेदनादायी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रमिक ट्रेन्सबाबत पियुष गोयल यांचे आभार मानले आहे. हा सर्व संवाद सोशल मीडियावर उपलब्ध असून महाराष्ट्राबाबत सातत्याने गैरसमज पसरविण्यात येत आहे."
"आम्ही खासदारांनी एकमेकांच्या राज्यात अडकलेल्या लोकांची सोय केली. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली. यासाठी आम्ही एकमेकांचे जाहीर आभार मानले आहेत. अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करणे या देशाची संस्कृती आहे. आपण आता राजकारणासाठी माणुसकी पण विसरणार आहोत का?"
सातत्याने महाराष्ट्रावर टिका केली जाते. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी काम केलं जातं. महाराष्ट्राचे प्रकल्प बाहेर दिले जातात. पण एक सांगू इच्छिते की, महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, "कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीचे जे संसदेचे अधिवेशन सुरु होते त्या अधिवेशनात तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय हे यांनी सभागृहात प्रधानमंत्र्यांकडे पायी चालत जाऊन प्रत्यक्ष विनंती केली होती की कृपया अधिवेशन आता थांबवू. खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ द्या. मात्र त्यांनी त्यावेळी ते ऐकले नाही. कारण ते मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यात व्यस्त होते", असा टोलाही खासदार सुळे यांनी लगावला.
हा राज्याच्या अस्मितेचा विषय असून भाजपतील आमदार-खासदारांनीही याचा जाब विचारावा असे आहान करुन त्या म्हणाल्या की "पंजाब आणि उत्तर प्रदेशासोबत आपले किती जुने संबंध आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण प्रधानमंत्र्यांसारखी जबाबदार व्यक्ती आपल्या भाषणातून आपल्यात वितुष्ट आणू पाहते हे दुर्दैवी आहे", असे खासदार सुळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.