Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या नागरी सहकारी बँक गटात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांचा निसटता विजय झाला. त्यांना शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी विजयासाठी अखेरपर्यंत झुंजवले. या विजयानंतर देशमुख समर्थकांनी गद्दार गद्दार घोषणाबाजी केली. त्याबाबत मनीष देशमुख यांनी कानावर हात ठेवत कार्यकर्त्यांकडे बोट ठेवले आहे, त्यामुळे नागरी सहकारी बॅंकेच्या गटात गद्दारी कोणी केली, असा सवाल चर्चिला जात आहे.
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत नागरी सहकारी बॅंक मतदारसंघातून सहकार क्षेत्रातील नवखे उमेदवार शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी तब्बल २८३ मते घेत मनीष देशमुख यांना पळताभूई थोडी केली होती. मात्र, काही तालुक्यांनी दिलेल्या भक्कम साथीमुळे देशमुख यांचा २९ मतांनी विजय होऊ शकला. अन्यथा माजी सहकारमंत्र्यांचे चिरंजीव देशमुख यांना पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ आली असती.
भाजप नेत्याच्या मतदारसंघातून अमोल शिंदे यांना पडलेल्या मतांची आकडेवारी पाहून देशमुख समर्थक संतप्त झाले होते. मतमोजणीच्या ठिकाणी नेतेमंडळी असतानाच देशमुख समर्थकांनी'गद्दार गद्दार' म्हणत घोषणाबाजी करण्यात आली. भाजपतील अंतर्गत गटबाजीचे दर्शन मतमोजणी केंद्राच्या बाहेर दिसून आले. मात्र, मतदान कमी का झालं, याचं आत्मपारीक्षण करणार असल्याचे विजयी उमेदवार मनीष देशमुख यांनी स्पष्ट केलं.
मनीष देशमुख म्हणाले, निवडणुकीत गडबड होतं की काय असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. मागील निवडणुकीत सुभाष देशमुख यांना यश मिळालं नव्हतं. मात्र, या निवडणुकीत ते यश मला मिळालं आहे, याचं आम्हाला समाधान आहे.
गद्दार कोण आहे, हे कार्यकर्त्यांनाच विचारावं लागेल. पण मला तसं वाटत नाही. कारण सगळ्यांनीच सहकार्य केलेले आहे. उत्तर सोलापूर तालुका आणि शहर हे एकत्रित मतदान असल्यामुळे नेमकी तफावत कुठे पडली आहे, हे पाहावे लागेल. तसेच आम्ही कुठे कमी पडलो, हेही आम्ही तपासणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
सर्वच तालुक्यात मला लीड आहे. सर्वच तालुक्यातील नेत्यांचे सहकार्य लाभले आहे. कुठेच कुरघोडी झाल्याचे दिसून येत नाही, असेही मनीष देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.