Solapur, 06 September : सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कोण आहेत, विजयराज डोंगरे की अतुल पवार? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सध्या स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्य येणार आहे. स्वीकृत सदस्याच्या नियुक्तीत गटनेत्याला अधिक महत्व आहे. गटनेता ज्या नावाची शिफारस करतील, त्याला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीतील गटनेत्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ सदस्य विजयी झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील चार सदस्य हे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृतवाखाली काम करत आहेत. माढा आणि करमाळा तालुक्यातील चार सदस्य माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत.
या शिवाय मोहोळ, सांगोला आणि माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य विजयी झालेला आहे. मोहोळमधील सदस्य विजयराज डोंगरे हे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मर्जीतील, तर सांगोल्यातील सदस्य अतुल पवार हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मर्जीतील मानले जातात.
राष्ट्रवादीतील गटनेते पदावर विजयराज डोंगरे आणि अतुल पवार या दोन्ही सदस्यांनी दावा केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या तरी या दोन्ही नावावरून सध्या संभ्रम दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीची संपूर्ण जबाबदारी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. जिल्हा परिषदेतील गटनेत्यांसोबत जिल्हाधिकारी स्वीकृतच्या निवडीबाबत चर्चा करणार आहेत. तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन ते गटनेत्यांकडून स्विकृत सदस्यासाठी नावे घेणार आहेत.
स्वीकृत सदस्यासाठी शासनाने ठरवून दिलेली पात्रता तपासण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन करणार आहे, त्यानंतर ही नावे जिल्हा परिषदेकडे पाठविली जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून कोणाला चर्चेला बोलविले जाणार? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. या आठवड्यात या संदर्भातील मोठी घडामोड शक्य मानली जात आहे.
कोण होणार स्वीकृत सदस्य
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एका सदस्यत्वासाठी कोणाला संधी मिळणार? याबद्दलची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वीकृत सदस्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या निवडीचा तिढा सोलापूरमध्येच सुटतो की बारामतीमधून सुटतो की तिढा कायम राहतो हे पाहावे लागेल. कारण त्यांना पक्षांर्तगत बरोबच महायुतीमधील इतर पक्षांकडूनही विरोध असल्याचे बोलले जात आहे.
या पंचायत समितीतही मिळणार संधी
जिल्हा परिषदेबरोबरच करमाळा, मोहोळ, पंढरपूर या तीन तालुका पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादीला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहे. या ठिकाणीही कोणाला संधी मिळणार? याबाबतची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.