Solapur, 26 July : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशानंतर बँकेने ४ हजार ५८१ सभासदांची यादी विभागीय सहनिबंधकांना सोमवारी (ता. २० जुलै) सादर केली आहे. बँकेची निवडणूक प्रक्रिया चार आठवड्यांत सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने शुक्रवारच्या (ता. २४) सुनावणीत दिल्याने आता या यादीवरील प्रक्रियेला सोमवारपासून (ता. २७ जुलैपासून) अधिक गती येणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या १ जुलै २०२६ या अहर्ता तारखेवर मागील तीन वर्षांत सभासद असलेली यादी बँकेने सादर केली आहे. या यादीतील ४५८१ सभासदांमध्ये मृत, थकबाकीदार आणि अवसायनात असलेल्या सहकारी संस्थेचाही समावेश आहे.
यातील मृत, थकबाकीदार व अवसायनातील संस्था वगळून यादी सादर करण्याच्या सूचना सहनिबंधक कार्यालयाकडून आल्यानंतर तशा पद्धतीने यादी सादर केली जाणार आहे. या यादीनंतर सहनिबंधक कार्यालयाकडून मतदार प्रतिनिधीच्या ठरावाचे वेळापत्रक दिले जाणार आहे. ठराव झाल्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, विधान परिषद या निवडणुकीनंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरातील सलग पाचवी मोठी निवडणूक होत आहे.
मागील काळात झालेली पक्षांतरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या काही वर्षांत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये केलेली एन्ट्री आणि सत्तेचे पाठबळ पाठीशी असल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे. भाजपविरोधात कोणाचे पॅनेल होणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रिया जसजशी पुढे जाईल, तसंतसे भाजपविरुध्द कोण? याही प्रश्नाचे उत्तर मिळेल.
कोणत्या तालुक्यात किती सभासद
अक्कलकोट : १६५
बार्शी : ४३५
करमाळा : २५५
माळशिरस : ६०८
माढा : ७२९
मंगळवेढा : २०९
मोहोळ : ३२४
पंढरपूर : ४४९
सांगोला : ४९९
उत्तर सोलापूर : ७३२
दक्षिण सोलापूर : १७६
एकूण : ४५८१
कोणत्या मतदारसंघात किती सभासद
- विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था : १२९२
- खरेदी विक्री संघ, सहकारी साखर कारखाने, ऑईल मिल्स, सूत गिरण्या, शेतमालक प्रक्रिया संस्था : १४०
- दूध संस्था व व्यक्ती सभासद : १५५७ (दूध संस्था : १२३६, व्यक्ती : ३२१)
- नागरी बँका व पतसंस्था : १५९२ (नागरी बँका, नागरी पतसंस्था : ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, पगारदार नोकर पतसंस्था : ७९६, ग्राहक, पाणी पुरवठा संस्था व इतर : ७८५)
-बाजार समिती व इतर संस्था : ११
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.