Kolhapur, 24 January : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक दिवसांनंतर जाहीर कार्यक्रमात एकत्र आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजितदादांनी पवार यांच्या शेजारी बसणे टाळले होते. त्याची गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती. त्यावर आता खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. तसेच, अजित पवारांनी खुर्ची बदलण्याचे कारणही स्पष्ट केले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय VSI) वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन्ही राष्ट्रवादीतील सर्व मातब्बर नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर एकत्र आलेल्या या नेत्यांमध्ये व्यासपीठावरच हास्यविनोद रंगला होता, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडणारे हेच ते नेते आहेत काय, अशा शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण व्हावी, अशी परिस्थिती ते व्यासपीठावरील चित्र पाहून वाटत होती.
दरम्यान, व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आसन व्यवस्था आयोजकांनी केली होती. मात्र, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारची खुर्ची बदलून त्या ठिकाणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची बसण्याची व्यवस्था करायला लावले होते. त्याबाबतची चर्चा कार्यक्रमानंतर दिवसभर रंगली होती.
खुर्ची बदलण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, व्हीएसआयच्या कार्यक्रमादरम्यान नवीन सहकार मंत्री बाबााहेब पाटील यांनी मला विनंती केली की, मला दोन-तीन गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत. त्यावर मी सहकार मंत्र्यांना म्हटलं, तुम्ही माझ्या शेजारी बसा. त्यामुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माझ्या शेजारी बसले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बंद दरवाजाआड राष्ट्रवादी पक्षाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोल्हापूरच्या एका साखर कारखान्याबाबत त्या ठिकाणी चर्चा झाली. त्यानिमित्ताने मी, अजित पवार, संबंधित कारखान्याचे चेअरमन आणि पदाधिकारी यांना एकत्र बोलावले होते. त्या कारखान्याबाबत आमची माझ्या चेंबरमध्ये चर्चा झाली, असेही शरद पवार यांनी अजित पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत भाष्य केले.
व्हीएआयच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात हास्यविनोद रंगला होता. एरव्ही हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, व्हीएसआयच्या बैठकीत हास्यविनोद करत चर्चा करत होते. जयंत पाटील, अजित पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विनोदावेळी तर अजित पवारांनी तोंडावर बोट ठेवत आता शांत राहावा, अशी सूचनाच केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.