Sanjay Raut-Chandrakrant Patil
Sanjay Raut-Chandrakrant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Raut News : ‘चंद्रकांतदादा, टोपी संभालो; आता कोथरूडमधून लढणार का’ : संजय राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

सांगली : कसबा पेठ विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या ३५ ते ४० हजार मतांच्या बळावर भाजप सतत निवडून येत होती. चिन्ह व पक्ष ज्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे ती मते असती, तर तिथे भाजप हरली नसती. हा कल पाहता चंद्रकांतदादा पाटील कोथरूडमधून लढतील का, हे त्यांना विचारावे लागेल. चंद्रकांतदादा, टोपी संभालो, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढवला. (Will Chandrakrant Patil now contest elections from Kothrud: Sanjay Raut)

कसब्यात जे घडले ते सांगली, मिरजेतही घडेल, असा विश्‍वास व्यक्त करताना त्यांनी २००९ ला मिरजेची जागा भाजपला सोडणे, ही चूक होती, अशी कबुली दिली. ते म्हणाले, ‘‘भाजप आणि आम्ही एकत्र लढत होतो. एका विचाराने जात होतो, त्यामुळे मिरजेची जागा सोडताना फार विचार केला नाही. पण, ती चूक होती. आता ती चूक होणार नाही. शिवसेना आपल्या हक्काच्या जागावर उदक सोडणार नाही. हा भाग आम्ही भाजपला आंदण दिला होता. आता आम्‍ही तो जिंकून दाखवू.’’

खासदार राहुल गांधी यांनी मोबाईल कॉल रेकॉर्डिंगबद्दल केलेल्या आरोपावर राऊत म्हणाले, ‘‘ज्यांचे कॉल चोरून ऐकले जातात, त्यात मीही एक आहे. ज्यांनी तसे आदेश दिले होते, त्या पोलिस अधिकाऱ्यावर आम्ही गुन्हा दाखल केला होता. सरकार बदलल्यानंतर त्याची चौकशी झाली नाही. हे गंभीर आहे.’’

अद्याप नोटीस मिळालेली नाही

संजय राऊत म्हणाले, ‘‘विधानसभेत दाखल हक्कभंग प्रकरणी खुलासा करण्याबाबतची नोटीस मला मिळालेली नाही. मी दौऱ्यावर आहे. माझ्या कार्यालयात नोटीस आलीय का पहावे लागेल. माझ्या हातात नोटीस मिळत नाही आणि मी त्याचा अभ्यास करत नाही, तोवर काय उत्तर देणार? या प्रकरणी शरद पवार यांनी कठोर मत मांडतात, तक्रारदारच कसा न्यायाधीश असू शकतो, हा मुद्दा उपस्थित केला आहे. मी संसदीय लोकशाही मानणारा आहे. मी जे बोललो ते चाळीस लोकांबद्दल बोललो होतो. त्या गटापुरते ते माझे मत आहे.’’

आंबेडकरही सोबत येतील

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक होईल, असा विश्‍वास राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘भाजपला रोखायचे असेल तर एकत्र आले पाहिजे, हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनाही मान्य आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत काही मुद्यांवर त्यांचे मतभेत असतील. आमचेही आहेत, मात्र मुख्य शत्रूचा पराभव हा महत्वाचा आहे.’’

सनसनाटीसाठी स्वतःवर हल्ला?

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावेळी हल्लेखोर खासदार राऊतांचे नाव घेत होते, असा आरोप झाला आहे. त्यावर राऊत म्हणाले, ‘‘या हल्ल्याबाबत मी माहिती घेतली नाही. काहीवेळा सनसनाटी निर्माण करण्यासाठी, प्रकाशझोतात येण्यासाठी स्वतःवर हल्ले करवून घेतले जातात. राज्यात तसाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न आहे. हल्ले, धमक्या उघडपणे दिल्या जातात. गृहमंत्री त्याकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT