Sanjay Mandlik |Dhairyashil Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापूर, हातकणंगलेत लोकसभेच्या उमेदवारीसाठी पेच; धैर्यशील माने आणि संजय मंडलिकांना पर्याय मिळणार का ?

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Politics : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदारसंघांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्हीही आघाड्या सक्षम उमेदवार हा निकष लावणार आहेत.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दक्षिण महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात दोन्हीही आघाड्यांसमोर उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच आहे. याठिकाणी इच्छुक खूप पण सक्षम उमेदवाराचा अभाव दिसून येत आहे.

कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात सध्या महायुतीचे खासदार आहेत. हातकणंगलेत शिवसेनेचे धैर्यशील माने आणि कोल्हापूरमध्ये शिवसेनेचेच संजय मंडलिक यांनी 2019 च्या निवडणुकीत विजय मिळवला, मात्र त्यावेळी दोन्हीही मतदारसंघातील समीकरण या दोघांच्या पथ्यावर पडली. हातकणंगलेत जातीची गणितं माने यांना अनुकूल ठरली. तर कोल्हापूरमध्ये बंटी पाटील आणि महाडीक वादात संजय मंडलिक खासदार झाले. आता परिस्थिती बदलली आहे.

या दोन्ही मतदारसंघाचा विचार करता इथे सतत बदल होत असतो. त्यात दोन्हीही खासदारांचा संपर्क नसल्याच्या तक्रारी आहेत. या सगळ्याचा विचार महायुती पुन्हा उमेदवारी देताना करणार हे स्पष्ट आहे. त्यातच राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे हे मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार यावरही उमेदवारी ठरणार आहे.

हातकणंगले मतदारसंघात भाजपाचे राहुल आवाडे हेही तयारी करत आहेत तर ऐनवेळी सदाभाऊ खोतही संधी मिळाल्यास मैदानात येऊ शकतात, तर माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका संदिग्ध आहे. कारण त्यांनी 2019 च्या निवडणुकीत कॉग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून निवडणूक लढवली. मात्र सध्या त्यांचे दोन्ही आघाड्यांशी सख्य दिसत. त्यामुळे महाविकास आघाडीला सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे.

ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलीक यांना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मदत केली होती. आता संजय मंडलिक यांना बंटी पाटील मदत करणार नाहीत, त्यातच महायुतीतील नेतेही संजय मंडलीक यांच्या संपर्काबाबत नाराज आहेत. त्याचा फटका त्यांच्या उमेदवारीला बसू शकतो. त्यामुळे महायुती धोका पत्करणार नाही. याठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ, समरजीतराजे घाडगे यांच्या नावावरही विचार होऊ शकतो. महाविकास आघाडीत ही जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असली तरी ऐनवेळी बंटी पाटील यांच्या सारख्या सक्षम उमेदवारालाही रिंगणात आणलं जाण्याची शक्यता आहे.

45 खासदार अस टार्गेट ठेवून चाललेल्या महायुतीला रोखण्यासाठी या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीही जोरदार ताकद लावेल, त्यामुळे इथली निवडणूक कोणालाही सोपी नाही त्यामुळे जिंकणं हा निकष ठेवूनच उमेदवार रिंगणात आणले जातील. यामुळे या दोन्ही मतदारसंघात काटा लढत बघण्यास मिळेल हे निश्चित.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT