Satara Dcc Bank Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank : सातारा Dcc बॅंकेच्या 12 जागांच्या निकालात राष्ट्रवादी भाजपला धोबीपछाड देणार? मोठा भाऊ जयकुमार गोरे की मकरंदआबा?

Mahayuti News : सातारा जिल्हा बँकेच्या बारा जागांची मतमोजणी तीन नोव्हेंबरला होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागांसाठीची लढत अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रभाव टाकणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 02 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १२ जागांची मतमोजणी उद्या (मंगळवारी, ता. ०३ नोव्हेंबर) होणार आहे. या १२ जागांपैकी महायुतीमधील कोणता कोण किती जागा जिंकणार आणि मोठा भाऊ ठरणार, यावर बॅंकेचा अध्यक्षपदाचा फैसला अवलंबून आहे. १२ जागांपैकी ७ ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी तर तीन ठिकाणी भाजप-शिवसेनेत लढत होत आहे. त्यामुळे या १२ जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकण्याची स्ट्रॅटेजी राष्ट्रवादीकडून मंत्री मकरंद पाटील यांनी, तर भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी आखली आहे.

जिल्हा परिषदेपाठोपाठ जिल्हा बॅंकेचा अध्यक्षही भारतीय जनता पक्षाचा करण्याचा चंग पक्षाच्या नेत्यांनी बांधला आहे. मात्र, उर्वरीत १२ जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला धोबीपछाड देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बॅंकेत भाजप-राष्ट्रवादीत सत्तास्पर्धा रंगणार, हे निश्चित आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, तर शिवसेनेचे एक अशा संचालकांचा समावेश आहे. उर्वरीत १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात होते. त्यातील काहींनी माघार घेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

या १२ जागांपैकी सात ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये, तर तीन ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. यात माणमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात शिवसेनेचे शेखर गोरे, राष्ट्रवादीचे मनोजकुमार पौळ, पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई विरोधात भाजपचे सत्यजित पाटणकर, कऱ्हाडमध्ये राष्ट्रवादीचे ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर विरुद्ध धनंजय पाटील अशा लढती झाल्या आहेत.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जावळी, कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, औद्योगिक-विणकर व मजूर संस्था, इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्ग या सात ठिकाणी लढत झाली आहे. भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांत महाबळेश्वर, माण, फलटण या तीन ठिकाणी लढत झाली.

कोरेगावात सुनील माने व सुनील खत्री हे दोन मित्र एकमेकांविरोधात लढत झाली आहे. खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले व भाजपचे संजीव गाढवे यांच्यात अटीतटीची लढत झाली. मंत्री मकरंद पाटील यांनी अजय भोसलेंच्या पाठीशी ताकद लावली आहे. महाबळेश्वरमध्ये विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे यांची पत्नी रूपाली राजपुरे विरुद्ध शिंदेसेनेचे संजय मोरे उभे आहेत. जावळीत विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे हे लढत देत आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या १० वर्षांच्या नियमांमुळे अनेक दिग्गजांना निवडणुकीतून बाहेर पडावे लागले आहे, त्यामुळे सध्या मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या तीन नेत्यांचेच बॅंकेत चालणार आहे. उर्वरित नेत्यांना बाहेरून बॅंकेतील कामकाजावर लक्ष ठेवण्याव्यतिरिक्त काहीही असणार नाही.

महायुतीमध्ये झालेल्या १२ जागांच्या लढतींपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, तर चार जागांवर भाजपचे आणि तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बॅंकेत मोठा भाऊ होण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT