Satyajit Singh Patankar, Shambhuraj Desai, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan Assembly Election : "यांच्या काळात विकास नव्हे, परमीट रूम, बिअर बार..."; पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून जयंत पाटलांचा हल्लाबोल

Patan Vidhan Sabha Elections 2024 : "महायुतीच्या राज्यकर्त्यांना लाडकी बहीण, लाडक्या योजना महत्त्वाच्या नसून लाडकी खुर्ची महत्त्वाची असल्याने जनता त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवणार आहे. राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे."

सरकारनामा ब्युरो

Patan News, 15 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP) शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. याच यात्रेतील भाषणात पाटण विधानसभा मतदारसंघातून सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून द्या, असं आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

यावेळी त्यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर हल्लाबोल केला. "महायुतीच्या राज्यकर्त्यांना लाडकी बहीण, लाडक्या योजना महत्त्वाच्या नसून लाडकी खुर्ची महत्त्वाची असल्याने जनता त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, आघाडीची सत्ता येणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही. पाटणची (Patan) हुकूमशाही संपवून जनतेला न्याय देण्यासाठी आघाडी सरकारमध्ये पाटणचा आमदार म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांना तुम्ही निवडून द्या", असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत ते बोलत होते. या वेळी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील माने इत्यादी प्रमुख नेते उपस्थिती होते.

पाटण तालुक्यासह राज्याने पाटणकर दादांचा मंत्रिपदाचा काळ अनुभवला. मात्र, सध्याचे मंत्री हे दहशत माजवत गैरप्रकाराला पाठबळ देत असल्याचा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केला. ते म्हणाले, मंत्र्यांच्या काळात विकास नव्हे, तर परमीट रूम, बिअर बार वाढले. जनतेने यांना यासाठी आमदार मंत्री केले होते का? वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढले आहे.

याचा गांभीर्याने विचार करा. महायुती सरकारने राज्य विकायला काढले असून, योजनांच्या नावाखाली भरमसाट पैशांची उधळण सुरू आहे. वास्तविक राज्याच्या स्थापनेनंतर इतके महाभयंकर भ्रष्टाचारी सरकार आजपर्यंत कधीही सत्येत आले नव्हते. मात्र, हे बेजबाबदार लोक खुर्चीत बसल्यानंतर केवळ भ्रष्टाचार मलिदा गँग, कमिशन, टक्केवारी यातच ही मंडळी गुरफटल्याने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे."

पाटण विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच काँग्रेस आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेंना मानणारा निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पाटण दूध संघाचे अध्यक्ष सुभाषराव पवार यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.

सत्यजितसिंह यांना साथ द्या

आतापर्यंत पँट, शर्ट, चपला विकत घेता येत होत्या दुर्दैवाने यांच्या काळात आमदार, खासदारही विकत घेतले जातात. सुरत, गुवाहाटी, गोवामार्गे जाणाऱ्या पाटणच्या दमदार आमदारांना आता गद्दार आमदार म्हणून कलंक लागला आहे. अशा गद्दार आमदारांना आता कायमचे घरी बसवा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे, त्यात पाटणचा निष्ठावंत आमदार म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून द्या, असं आवाहन खासदार अमोल कोल्हेंनी या सभेत केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT