Dr Manik Mangudkar-Prabhatai Zadbuke-Nirmalatai Thokal-Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi Politic's : राजेंद्र राऊत यांच्या विजयाने बार्शीला चौथ्यांदा मिळाले दोन आमदार!

Rajendra Raut Victory : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी ३६५ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे बार्शीला एकाच वेळी दोन आमदार मिळाले असून तालुक्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 June : विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत हे ३६५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना पराभूत करत विजयी झाले आहेत. राजेंद्र राऊत यांच्या विजयामुळे बार्शीला एकाच वेळी दोन आमदार मिळाले असून तालुक्याला चौथ्यांदा दोन आमदार मिळाले आहेत. यापूर्वी तालुक्यातील तिघांनी विधान परिषदेत काम केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंतराव देशमुख यांनी दंड थोपटले होते. पुरेसे संख्याबळ हाती नसतानाही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशमुख यांनी राऊतांपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरभक्कम महायुतीपुढे मोहिते पाटील यांच्यासह देशमुखांचा निभाव लागू शकला नाही.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली. राऊतांनी त्या संधीचे सोने करत पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास साथ ठरवला. राजेंद्र राऊत यांना ४८३, तर देशमुख यांना ११८ मते मिळाली. १३ मते अवैध ठरली. यात राऊतांनी ३६५ मतांनी बाजी मारली आहे.

राजेंद्र राऊत यांच्या विजयामुळे बार्शीला एकाच पंचवार्षिकमध्ये दोन आमदार मिळाले आहेत. दिलीप सोपल हे विधानसभेला निवडून गेलेले आहेत. त्यामुळे सोपल आणि राऊत असे दोन आमदार बार्शीला मिळाले आहेत. यापूर्वी तीनवेळा अशी संधी बार्शीला मिळालेली आहे.

बार्शी तालुक्यातून विधान परिषदेवर पोहोचणारे पहिले नेते डॉ. माणिक पद्मण्णा मंगुडकर होते. तालुक्यातील भातंबरे गावचे ते रहिवासी होते. काँग्रेस पक्षाकडून १९६६ आणि १९७२ अशा दोन वेळा सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यांची १९६६ मध्ये बिनविरोध निवड झाली होती, तर १९७२ मध्ये ८६ टक्के मते मिळवून विजयी झाले होते.

मंगुडकर यांच्यानंतर काँग्रेसच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची १९७८ मध्ये सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवड झाली होती. त्यांनी १९७८ ते १९८४ या कालावधीत विधान परिषदेच्या सदस्या म्हणून काम केले आहे. याबाबतची माहिती ॲड विनय गायकवाड यांनी दिली आहे.

डॉ. मंगुडकर आणि प्रभाताई झाडबुके यांच्यानंतर बार्शीच्या निर्मलाताई ठोकळ यांनाही विधान परिषदेत काम केले आहे. त्या १९८२ मध्ये राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर निवडल्या गेल्या होत्या, त्यामुळे राऊत यांच्या अगोदर डॉ. माणिक मंगुडकर, प्रभाताई झाडबुके आणि निर्मलाताई ठोकळ या बार्शीच्या नेत्यांनी विधान परिषदेतही काम केले आहे. राऊत यांच्या रुपाने चौथ्यांदा बार्शीला दोन आमदार मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT