Yashomati Thakur News Updates,
Yashomati Thakur News Updates,  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेस संपली नाही, संपणारही नाही...

आनंद गायकवाड

Yashomati Thakur : काँग्रेसची पडझड झाली असली, तरी पक्ष संपला नाही, संपणारही नाही. संविधानाच्या मजबूत पायावर उभ्या असलेल्या काँग्रेस पक्षाची विचारधारा देशात अद्यापही टिकून असल्याचे स्पष्ट चित्र खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत दिसते, असे मत माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संगमनेरमध्ये एका कार्यक्रमासाठी ठाकूर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाकूर म्हणाल्या, की अनाथ एकल बालके व महिलांना मिळणाऱ्या मासिक रकमेत वाढ करण्याच्या प्रस्तावाला नवीन सरकारने स्थगिती देण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. भाजपने अमरावतीला रणांगणाचे स्वरूप दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस बंद असल्याबद्दल काँग्रेसने आंदोलन केले आहे. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा सांगणारे असून, सर्वधर्मसमभावाला मानतो. अशा निर्णयाने विकासकामे मागे पडतात. मध्य प्रदेशमधील जबलपूरला व्यापार व इतर कामानिमित्त जाणारी मंडळी आहेत. त्यांच्याशी आमचे जवळचे नाते आहे. अमरावतीच्या विकासासाठी ही एक्स्प्रेस सुरु असण्याची गरज आहे. खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटला जुमानत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

देश व राज्यात काँग्रेसची विचारधारा टिकून आहे. प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 44 जागांवर यश मिळाले. आता लोकांना खरं खोटं समजलं आहे, असे त्यांनी सांगितले.

जनतेला देशाची प्रगती हवीय

जनतेला शांतता, प्रेम, सर्वधर्म समभाव आणि देशाची प्रगती हवी आहे. नवीन सरकारचा काहीच ठावठिकाणा दिसत नाही. आमच्या आमदारांना निधी मिळण्यातही अडचणी येत आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल कोणाला दुमत असण्याचं कारण नाही. ते निरागस आणि स्वच्छ मनाचे आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केलेले असतानाही संविधानाचे रक्षण व देश जोडण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल पाहता ते यशस्वी होतील, असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT