Sambhaji Bhide, Sudha Murthy News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संभाजी भिडे आणि सुधा मुर्तींच्या भेटीबद्दल खुलासा करणारी पोस्ट डिलीट; कारण काय?

Sudha Murthy News : संभाजी भिडे आणि सुधा मुर्ती यांच्या भेटीबद्दल धक्कादयक खुलासा करणाऱ्या योजना यादव यांनी फेसबुक पोस्ट डिलिट केली.

सरकारनामा ब्यूरो

Sudha Murthy News : एका कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये (Sangli) आलेल्या 'इन्फोसिस फाउंडेशन'च्या प्रमुख सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची भेट घेतली. या वेळी सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) चर्चांना उधाण आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी याबाबत धक्कादायक खुलासा करणारी पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. मात्र, ही पोस्ट नंतर डिलिट करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

संभाजी भिडे यांनी सुधा मूर्तींना भेटण्याचा हट्ट केला आणि त्यानंतर अगदी हॉटेलपासून कार्यक्रमाच्या हॉलपर्यंत सगळीकडे त्यांचे कार्यकर्ते सुधा मूर्तींचा पाठलाग करत होते, असा खळबळजनक दावा आयोजक योजना यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर यादव यांनी ही पोस्ट डिलिट केली. त्यामुळे आता त्यांनी पोस्ट डिलिट करण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल विचारला जात आहे.

यादव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले होते, ''ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, हे महाशय हट्टाला पेटले होते. आम्ही ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितले होते. पण त्यांनी त्यांचे हॉटेल शोधले. सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथे पोहोचले. परत गेले. सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी 5 ला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले होते.''

'शेवटी सुधाताईंना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढले. त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. गाडीत त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचे आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हते,' असा दावा यादव यांनी केला होता.

''आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. आमचा नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तस पोलिसांना टेन्शन येऊ लागले. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेना यांना भेटू द्या. कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचे नव्हते. तरी त्या नाईलाजाने उठल्या. आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचे वय विचारले फक्त. फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला'', असा खुलासा यादव यांनी केला होता.

''सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितले की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचे आहे. सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, ' योजना, अग अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचे असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचे. आणि सोडून द्यायचे' आणि ANI सारख्या मीडियाने ही अशी बातमी देणे म्हणजे सगळ्यात दुर्दैव आहे,'' असे योजना यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT