Tanpure Sahakari Sakharkarkhana
Tanpure Sahakari Sakharkarkhana sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा : गळीत हंगाम सुरू करण्यास असमर्थ

विलास कुलकर्णी

Tanpure Sahakari Sakharkarkhana : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अखेर तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला. आज मंगळवारी (ता.१) बँकेतर्फे ३५ सुरक्षा रक्षक कारखान्यावर तैनात करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने, द्विपक्षीय करारानुसार कारवाई केल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी नंदकुमार पाटील यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेचा वित्तपुरवठा आहे. 2013 साली कारखान्यावर 60 कोटींच्या कर्जाची थकबाकी होती. तेव्हा, बँकेने कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त केली होती. 2016 साली कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले.

2017 साली 90 कोटी कर्जाचे पुनर्गठन होऊन, अकरा वर्षांसाठी मुद्दल, व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले. बँक व कारखाना व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय करार होऊन, बँकेने जप्त केलेली मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना 2017-18 पासून सुरू झाला. 2019-20 मध्ये ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. मागील वर्षी 4 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.

कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून 48 कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु, सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठण करताना 90 कोटींची मुद्दल कायम राहिली. त्यावर ऑक्टोबर 2022 अखेर 21 कोटींच्या व्याजासह 111 कोटी कर्जाची थकबाकी झाली आहे. बँकेने कर्जफेडीसाठी 500 ऐवजी 100 रुपये प्रतिक्विंटल साखरेवरील टॅगिंग करावे, असा कारखाना व्यवस्थापनाचा आग्रह होता. परंतु, त्यास बँकेने नकारघंटा वाजविली. त्यामुळे, यंदाच्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम चालविण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दाखविली.

कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेला मालमत्ता ताब्यात देण्याच्या सुपूर्दनाम्याची गरज नाही. गाळप हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने, द्विपक्षीय कराराचा भंग झाला आहे. करारातील अटी, शर्तीनुसार बँकेतर्फे कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केली आहे.

- नंदकुमार पाटील, सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी, एडीसीसी बँक, अहमदनगर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT