Pavanraje Nimbalkar murder case latest update Sarkarnama
महाराष्ट्र

Pavanraje Nimbalkar murder case : पवनराजे निंबाळकर हत्याकांड: 20 वर्षांनंतर अंतिम निकाल लागणार; माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश!

Pavanraje Nimbalkar murder case latest update : पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील अंतिम निकाल 20 वर्षांनंतर जाहीर होणार आहे. माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rashmi Mane

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याप्रकरणी तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा आज महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालय या बहुचर्चित खटल्याचा अंतिम निकाल जाहीर करण्याची शक्यता असून, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

या प्रकरणात माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपींना न्यायालयाने निकालाच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींमध्ये माफीचा साक्षीदार पारसमल जैन, गुरूर दिग्विजय तिवारी, पिंटू ऊर्फ छोटे पांडे आणि इतरांचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 जून 2006 रोजी मुंबईजवळील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली होती.

दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांनी अनेक पुरावे न्यायालयासमोर मांडले. या खटल्यात एकूण 128 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. तपासाच्या प्रक्रियेत अनेक धक्कादायक बाबी आणि विविध संबंध उघड झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा खटला राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रकरणांपैकी एक ठरला.

दरम्यान, काही आरोपींना याआधी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र अंतिम निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. आज न्यायालय कोणत्या आरोपींना दोषी ठरवते, कोणाला दिलासा मिळतो आणि या बहुचर्चित हत्याकांडाचा शेवट नेमका कसा होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT