काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक परिस्थितीवर अत्यंत कडक आणि घणाघाती शब्दांत टीका केली आहे. येत्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, डिझेलचा दर तब्बल 150 रुपये तर पेट्रोल 170 रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडू शकते.
इंधनाचा तुटवडा असतानाही सरकार ते मान्य करत नाही. ट्रॅक्टरसाठी आरसी बुक मागणे हाच इंधन तुटवड्याचा मोठा पुरावा आहे, असे ते म्हणाले. एअर इंडियाने आपल्या विमानांच्या फेऱ्यांमध्ये २० टक्के कपात केली आहे, यावरूनही त्यांनी परिस्थितीची गंभीर जाणीव करून दिली. वडेट्टीवार यांनी निवडणूक आणि राजकीय पळवापळवीवर भाष्य केले.
गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्चित न झाल्याने काही लोक सहलीला गेले आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत वाटाघाटी अजूनही पूर्ण न झाल्यामुळे उमेदवारांची नावे निश्चित होण्यास वेळ लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील दुर्गाडी भागात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख केला. सरकार जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण आणि दोन धर्मांमध्ये तेड निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधानाची भाषा करणाऱ्या या सरकारमधील मंत्री अत्यंत असंवेदनशील आहेत. देशातील जनता महागाईने होरपळत असताना, मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशा प्रकारे धार्मिक वाद निर्माण केले जातात, असा थेट आरोप त्यांनी केला.
बँकिंग क्षेत्राबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. रिझर्व्ह बँकेतील पैसा सरकार स्वतःच्या मालकीचा असल्यासारखा काढून घेत आहे, ज्यामुळे भविष्यात बँका धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे जनतेने आपले पैसे सुरक्षित ठेवावेत आणि कुठेही मोठी गुंतवणूक करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.