

Amit Shah Gives Positive Signals on Onion Purchase Policy: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून कांदा उत्पादकांना मोठा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कांदा खरेदी, साखरेचा किमान आधारभूत दर, इथेनॉल कोटा, कर्ज पुनर्रचना आणि अनुदान यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक संकेत मिळाले.
बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेऊ शकते. विशेषतः कांदा उत्पादकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्य सरकारने नैफेड आणि एनसीसीएफमार्फत थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याची मागणी केली होती. या मागणीला केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
सध्या 2 लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य असून ते वाढवून 10 लाख टनांपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बाजारातील दर स्थिर राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त शुल्क लावण्याबाबतही चर्चा झाली.
याशिवाय साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याबाबत अमित शाह यांनी सहमती दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील 2 महिन्यांत इथेनॉल कोटा वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्रचनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून मार्ग काढणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेमुळे राज्यातील कांदा, ऊस आणि साखर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.