Pm Narendra Modi Manohar Joshi Sarkarnama
महाराष्ट्र

Manohar Joshi : "शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड", पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंकडून शोक व्यक्त

सरकारनामा ब्युरो

माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी ( Manohar Joshi ) यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानं मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, प्रकृती खालावल्यानं मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ( Manohar Joshi Passes Away Latest News )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत म्हटलं, "मनोहर जोशी यांच्या निधनानं दु:ख झाले. त्यांनी अनेक वर्षे लोकसेवेत घालवली. महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. लोकसभा अध्यक्ष असताना संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चारही विधिमंडळात काम करण्याचा बहुमान मनोहर जोशींना लाभला. मनोहर जोशी नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहे... ओम शांती..." ( Pm Narendra Modi On Manohar Joshi )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींच्या निधनावर दिली आहे. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले," असा शोक मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ( Cm Eknath Shinde On Manohar Joshi )

"महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

"शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत," अशी श्रद्धांजली मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, "मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली."

"शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली," असा शोक राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ( Raj Thackeray On Manohar Joshi )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT