udgir police satation  sarkarnama
महाराष्ट्र

Latur Police News : पोलिसांना बोकडाचा बळी देणे पडले महागात; गृहमंत्री फडणवीसांनी दिले 'हे' मोठे आदेश

Martahi News : उदगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच बोकडाचा बळी दिला होता.

Sachin Waghmare

Nagpur News : लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले म्हणून चक्क एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच बोकडाचा बळी दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराला जबाबदार अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाईची मागणी करण्यात आली होती,तर दुसरीकडे पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी हा प्रकार ठाण्यातील जातीयवादी कर्मचारी आणि गटबाजीतून मुद्दाम घडवून आणल्याचा आरोप करत हात झटकले होते.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी काय कारवाई करणार, अशी पत्रकारांनी विचारणा केली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

त्यामुळे उदगीर येथील पोलिस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी देण्यात आल्याचा हा प्रकार पोलिसांना चांगलाच महागात पडला आहे. गतप्राण झालेले हे बोकड एका फार्महाऊसवर नेऊन त्याची बिर्याणी करून सगळ्यांनी प्रसाद म्हणून ती खाल्ली होती. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या प्रकाराची बुधवारी दिवसभर चर्चा रंगली होती. त्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक भूमिका घेतली होती.

कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसाकडूनच पोलिस ठाण्यात अशा प्रकारे कायद्याला हरताळ फासण्यात आल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघात आणि गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी बोकडाचा बळी देण्यात आल्याची भनक लागताच एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण मिटवामिटवीचे आणि टोलवाटोलवीचे प्रकार सुरू झाले होते. ज्यांनी बोकड कापण्याची आयडिया दिली, ते आणि ज्यांनी बिर्याणीचा प्रसाद खाल्ला ते सगळेच एकमेकांकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत होते.

SCROLL FOR NEXT