Uddhav Thackeray Pratap Sarnaik Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : मंत्र्यांना मराठीचा अपमान करण्याचा परवाना मिळाला का? बाळासाहेबांच्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम चालवलयं

Balasaheb Thackeray Legacy Insult: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मुंबईतील कष्टकऱ्यांची, गिरणी कामगारांची मराठी भाषा तेजाने तळपत राहावी म्हणून श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम ‘एसंशिं’ गटाने चालवले आहे," अशा शब्दात ठाकरे गटानं शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Ministers Controversy: एकनाथ शिंदेंचे शिलेदार, मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं वाद निर्माण झाला आहे. मराठी भाषा, मराठी माणसांसाठी लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सरनाईकांना 'सामना'च्या अग्रलेखातून धारेवर धरलं आहे.

मराठीच्या छाताडावर उपऱ्यांना बसविण्याची सूट मिळाली आहे काय? याचे आधी उत्तर द्या. महाराष्ट्राची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे व त्यातील साधारण नऊ कोटी लोक मराठी बोलतात. मराठीत व्यवहार करतात. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत भाषा आहे व येथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असा कायदा असल्याचे ‘एसंशिं’ गटाच्या मंत्र्यांना माहीत नाही काय?" असा सवाल ठाकरे गटानं अग्रलेखात उपस्थित केला आहे.

"मुंबईतील मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावे, मराठी भाषेचा सन्मान राहावा यासाठीच शिवसेनेची स्थापना झाली. मराठीचे अनेक लढे शिवसेना पन्नास वर्षे लढत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मुंबईतील कष्टकऱ्यांची, गिरणी कामगारांची मराठी भाषा तेजाने तळपत राहावी म्हणून श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम ‘एसंशिं’ गटाने चालवले आहे," अशा शब्दात ठाकरे गटानं शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेवर प्रेमाचा वर्षाव करताच त्यांच्या मदतीस भाजप अध्यक्ष बावनकुळे धावून आले. ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिलाय हे विसरू नका,’’ असे ते म्हणाले. हा दर्जा दिला म्हणून तुमच्या मंत्र्यांना मराठी भाषेचा असा अपमान करण्याचा परवाना मिळाला आहे काय?" असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी शिकावे लागेल हे फक्त महाराष्ट्रापुरते धोरण नाही. बंगालमध्ये राहणाऱ्यांना बंगाली, गुजरातमध्ये राहणाऱ्यांना गुजराती, उत्तरेत राहणाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान प्राप्त करून त्या त्या राज्यात त्या भाषेत व्यवहार करावेच लागतील. आपल्या मातृभाषेचा किंवा राजभाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे आम्ही इतर भाषा भगिनींचा द्वेष करतो असे नाही, असे ठाकरे गटानं स्पष्ट केलं आहे.

मीरा-भाईंदर वगैरे भागात आल्यावर माझ्या तोंडून आपोआप हिंदी बाहेर पडते. कारण या भागाची भाषा हिंदी आहे व तुम्ही सगळे मला मतदान करता,’’ असे मराठी राज्याचे मंत्री सांगतात. हे मराठी राजभाषा धोरणात बसते काय? महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे व आता महाराष्ट्रातील केंद्रीय आस्थापना वगैरेतही मराठी सक्तीची केली आहे, याची आठवण ठाकरेंनी सरानाईकांना करुन दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT