Prithviraj Chavan, Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : ...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते! पृथ्वीराज चव्हाणांचं खळबळजनक विधान

Deepak Kulkarni

Karad Political News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक सर्व्हे समोर येत आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी महायुतीच्या पारड्यात सत्तेचा कौल दिला जात आहे.

पण एक गोष्ट खरी आहे की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अनपेक्षित पण दमदार कामगिरी केल्यामुळे मराठा आरक्षण,भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटातील वाद यामुळे महायुतीने काहीप्रमाणात विधानसभा निवडणुकीचा चांगलाच धसका घेतला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपलाही धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यातच काँग्रेसही कामाला लागली आहे.अशातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महायुती सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे. तसेच यावेळी त्यांनी राजकीय अनुभव आणि मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या सरकारबाबत गेल्या 10 वर्षांची जी अँटी इन्कबन्सी आहे.ती कमी करण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आहे, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमचं आकलन असं आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष निवडणूक वाचवू शकत नाहीत. तर एक मार्ग आहे की,राष्ट्रपती राजवट राबवायची.

आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, असं जर या सत्तेतील पक्षांना जर वाटत असेल आणि राज्यातल्या सरकारबाबत जी 10 वर्षांची अँटी इन्कबन्सी आहे. ती कमी करण्यासाठी येथे राष्ट्रपती राजवट लावून काहीतरी करुन काहीतरी चांगलं होईल याविषयी आशावादी राहायचं, असा विचार सत्ताधारी पक्ष करु शकतात असं वक्तव्य काँग्रेस नेते चव्हाण यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी राजवट लागू करण्यात आली तर आपल्याला सरकार टिकवता येईल. फक्त राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पॉलिटिकल असणार आहे.सध्याच्या महायुती (Mahayuti) सरकारची तयारी नसेल तर ते निवडणूक लांबू शकतात, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

आत्तापर्यंत 2009 पासून तीन निवडणुका झाल्या आहेत.त्यात हरयाणा आणि महाराष्ट्र अशा सोबतच घेण्यात आल्या आहेत.पण यावेळी विशेष परिस्थिती किंवा थातूरमातूर कारण सांगत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज आपण पाहतोय, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीत. इथले राज्यपाल रिपोर्ट देतील, इथली परिस्थिती योग्य नाही किंवा सुप्रीम कोर्टाकडून विरोधात निकाल आला, तर आमदार निलंबित होतील,यांसारखी अनेक कारणं सांगून केंद्रातील भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हालचाली करू शकतात.गृहमंत्र्याला थातूर मातूर कारण सांगून राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

राहुल गांधींच्या बचावासाठी मैदानात...

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांनी तिथं एका कार्यक्रमात भारतातील पक्षपातीपणा थांबेल, तेव्हा भारतातील आरक्षण थांबवण्याचा विचार काँग्रेस करेल. पण भारतात तशी स्थिती नाही, असे विधान केलं होतं.

या विधानावरून केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी महायुती भाजपने (BJP) काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घेरण्यास सुरवात केली आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, राज्याचे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करत इशारा दिला आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेस या मुद्यावर राज्यात बॅकफूटला जात असतानाच राज्यातील काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढं येत, सत्ताधारी महायुतीला खडसावलं आहे. "राहुल गांधींच्या विधानाची मांडणी चुकीची करू नका, समोरासमोर येऊन चर्चा करा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, तुम्ही तुमचे मांडा", असं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT