Devendra Fadnavis press conference : ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाताची चौकशी आधीच सुरू झाली आहे. त्यांच्या पक्षातर्फे सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत देखील मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे.
कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी त्या डीजीसीए किंवा आमच्याकडे द्याव्यात, त्यांचा निश्चित विचार करण्यात येईल. या अपघातामागचे तथ्य बाहेर आलेच पाहिजे अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. मंत्री नरहरी झिरवळ यांच्याविरोधात लाचखोरीसह दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भाष्य केलं.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाताबाबत सर्व तथ्य जनतेला समजलेच पाहिजे, ही आमचीही इच्छा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘मी स्वत: व्हीएसआर कंपनीच्या विमानाने चार ते पाच वेळा प्रवास केला आहे. या अपघाताची डीजीसीए, डीजी सेफ्टीकडून चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशीही सुरू केली होती. आता सीबीआय चौकशीच्या बाबत मी स्वत: अमित शहांशी बोललो आहे. डिजिटल रेकॉर्डर आदी डेटा डाऊनलोड केला आहे. व्हीएसआर कंपनीचे पूर्ण ऑडिट ‘डीजीसीए’ने सुरू केले आहे. त्यांच्या मागील काही वर्षांच्या सर्व फ्लाईटचे ऑडिट सुरू आहे. पण या चौकशीच्या निकालाची वाट पाहिली पाहिजे."
"कोणाच्याही मनात शंका असेल तर, ती शंका संबंधित संस्थेकडे व्यक्त केली पाहिजे. ‘डीजीसीए’ला पत्र लिहावे किंवा आम्हाला द्यावे. केंद्र सरकारला व नागरी उड्डाण मंत्रालयाला यात लपवण्यासारखे काही आहे, असे वाटत नाही. पण कोणत्याही पद्धतीने अजित पवार यांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल, अशा पद्धतीने कोणी वागू नये," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘‘अर्थसंकल्प मांडण्याची अजित पवार यांनी जोरदार तयारी केली होती. एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. दुर्देवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांना मी जवळून पाहिले आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थखाते निर्धास्तपणे देता येईल, असे अर्थमंत्री अजित पवार होते," असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
अर्थखात्याची शिस्त ते पाळायचे. कुठे जर आम्ही अधिक लोकप्रिय निर्णयांकडे गेलो व ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर, ते सांगणार की हे आर्थिक शिस्तीत बसत नाही. आवश्यक तिथे ते मार्ग देखील काढून द्यायचे, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.