Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Pune firing news : पुण्यातील गोळीबारानंतर CM फडणवीस संतापले; पोलिस महासंचालकांकडे व्यक्त केली नाराजी, पुणे पोलिस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता!

Devendra Fadnavis angry over Pune firing : पुण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पुणे पोलिस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Devendra Fadnavis Pune Crime News : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवरून मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीची नेमकी कारणे काय आहेत, अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर बुधवारी भरदिवसा मंदार किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे विरोधकांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकारची प्रतिमा मलिन

पुणे आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांशी चर्चा करून दोन्ही घटनांची माहिती घेतली. पुण्यात सातत्याने घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

पुण्यातील गुन्हेगारी वाढण्यामागची नेमकी कारणे काय आहेत? गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपेक्षित यश का मिळत नाही? याबाबत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल होणार?

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री नाराज असल्याने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता मुख्यमंत्र्यांनीही पुण्यातील गुन्हेगारीची गंभीर दखल घेतल्याने राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

सुषमा अंधारेंनी वाचला तीन वर्षांतील गुन्ह्यांचा पाढा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गेल्या तीन वर्षांत पुण्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच अंधारे यांनी वाचून दाखवला.

विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्याचा प्रवास आता कोयता नगरीच्या दिशेने सुरू आहे. पुणेकरांचे शहर 'क्राईम सिटी' होत असल्याची टीका अंधारे यांनी केली. कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरण, आंदेकर आणि कोमकर हत्याकांड, हिंजवडी, स्वारगेट आणि खराडी परिसरातील गुन्हेगारीच्या घटनांचा दाखला देत त्यांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पोलिस कोयते जप्त करतात, मग पुन्हा बाजारात कोयते येतात कुठून?

गुन्हेगारांना पकडले जाते, त्यांच्याकडून कोयते जप्त केले जातात. मात्र, पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोयते उपलब्ध कसे होतात? गुन्हेगारांना पिस्तुले एवढ्या सहजासहजी कशी मिळतात? याची उत्तरेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली पाहिजेत, अशी मागणी अंधारे यांनी केली.

महिला सुरक्षित नाहीत, आयटी कर्मचारी सुरक्षित नाहीत आणि आता न्यायालयाच्या परिसरातही नागरिक सुरक्षित नाहीत. न्यायालयाच्या परिसरातच अशा घटना घडत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहायचे, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.

पूर्णवेळ गृहमंत्री हवा

गृह विभागाच्या कारभारावर टीका करताना देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप अंधारे यांनी केला. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता असल्याची मागणीही त्यांनी केली आहे. गुन्हेगारीच्या घटनांनंतर केवळ अटकेची कारवाई करून चालणार नाही, तर गुन्हेगारीच्या मुळाशी जाऊन ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अमितेश कुमार यांच्याबाबत सरकार काय निर्णय घेणार?

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही सवाल केला आहे. अजून किती दिवस पुणेकरांनी अमितेश कुमार यांच्या भरोशावर राहायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी पोलिस आयुक्तांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता सुषमा अंधारे यांनीही थेट अमितेश कुमार यांना लक्ष्य केले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केवळ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देणार की प्रत्यक्षात पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल करणार? विशेषतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबाबत सरकार काय भूमिका घेणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT