Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या एका विधानाने रामदास कदमांचीही चौकशी होणार? एसआयटीला हवाय 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा 'सोर्स'!

Manoj Jarange audio clip source investigation SIT Inquiry : मनोज जरांगेंच्या विधानानंतर 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एसआयटीकडून क्लिपचा मूळ सोर्स शोधला जात असून रामदास कदम यांच्या चौकशीचीही चर्चा सुरू आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange Ramdas Kadam SIT Inquiry : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे यांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण विधानामुळे आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचीही चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्याला आणि रामदास कदम यांना ही ऑडिओ क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे कदम यांचीही चौकशी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

क्लिपचा 'सोर्स' सांगण्यास जरांगेंचा नकार!

एसआयटीचे अधिकारी आणि त्यांचे पथक क्लिप घेण्यासाठी आले होते. बराच वेळ ही प्रक्रिया सुरू होती. मात्र, आपला जबाब नोंदविण्यात आलेला नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. ''मी त्यांना सांगितले की, क्लिपचा सोर्स देता येणार नाही. तुम्हाला तो हवा असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. क्लिप देणाऱ्या व्यक्तीच्या जीवितास धोका आहे,'' असे जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Mantralaya employees strike : फडणवीस सरकारकडून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न : अखेर 'तो' आदेश धडकला!

रामदास कदमांकडे क्लिप कुठून आली?

ऑडिओ क्लिपच्या स्रोताबाबत बोलताना जरांगे यांनी थेट रामदास कदम यांचे नाव घेतले आहे. ''माझ्या अगोदर रामदास कदम यांनी ती क्लिप वाजवली होती. मला क्लिप देणारा माणूस आणि त्यांना क्लिप देणारा माणूस एकच असण्याची दाट शक्यता आहे. मग त्यांची का चौकशी होऊ नये? त्यांना क्लिप कोणी दिली?'' असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. जरांगे यांच्या या विधानामुळे क्लिपचा स्रोत जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे एसआयटीचे अधिकारी आता रामदास कदम यांच्याकडूनही याबाबत माहिती घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

'मराठा समाजाविरोधात खूप मोठा डाव होता'

मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. मराठा समाजाच्या विरोधात हा खूप मोठा डाव होता. गेल्या तीन वर्षांत मला प्रचंड त्रास झाला. आंदोलन मोडून काढण्याचे आणि मला बदनाम करण्याचे नियोजन केले जात होते, असा आरोप जरांगे यांनी केला. शरद पवार आणि राजेश टोपे माझ्या पाठीशी असल्याचे आरोप करून मोकळे व्हायचे, अशा आशयाचा संवाद या क्लिपमध्ये असल्याचा दावा जरांगे यांनी केला. भाजपचा पक्षनिधी वापरण्याबाबतही क्लिपमध्ये चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil
Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी टोकाचा वाद ; भाजप-शिवसेना आमनेसामने, युती तुटण्याच्या उंबरठ्यावर?

'जरांगेंच्या विरोधात बोला आणि पैसे घेऊन जा'

मनोज जरांगे यांनी यावेळी आपल्या विरोधात बोलण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोपही केला. आता जरांगे पाटलांच्या विरोधात बोला आणि पैसे घेऊन जा, अशी नवी मोहीम सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. माझ्याकडे खूप महत्त्वाचे पुरावे यायला लागले आहेत. सरकारकडून कोणी कोणी पैसे घेतले, त्यांची नावे दीड महिन्यात माझ्याकडे येतील, असेही जरांगे म्हणाले. मराठा समाजाने ज्यांना मोठे केले, त्यांच्याकडूनच आता पदाचा गैरवापर करून समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.