Raj Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणूक स्वबळावरच

Roshan More

Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीला महायुतीला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेला 225 जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार आहे. लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लोकसभेला महायुतीला साथ देणारी मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठींबा देताना महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. त्यांनी कोकण, पुणे, कल्याण-डोंबिवलीत सभा घेतल्या. तेथे महायुतीचे उमेदवार विजयी झाले. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे महायुतीसोबत राहणार की नाही याविषयी निश्चितता नव्हती.

सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या शपथविधीसाठी राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांकडून भाजपवर टीका करण्यात आली होती. राज ठाकरे यांनी देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते.

उद्धव ठाकरेंना फटका

मनसेने 225 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली असली तरी त्यांची ताकद ही महानगरांध्येच आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मनसेच्या नेत्यांकडून निवडणूक लढण्याची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे मराठी मतांमध्ये फूट पडून त्याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला बसण्याचा धोका आहे.

राज यांची भूमिका शिंदेंसाठी फायद्याची

राज ठाकरे यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. राज ठाकरेंमुळे मतांमध्ये फूट पडून त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसेल आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT