Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance:
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ‘सोड दादा ‘तुतारी-पंजा’ला, विझवी ते ‘मशाली’ला... येतो एकदा ‘मातोश्री’ला, बोलवू नकोस ‘भोंग्या’ला’

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: ‘कृष्णकुंजी’ आमरस-पुरी, बोलव ‘राजा’ या दादाला, वेड लागले त्या ‘भाई’ला, तुझ्याकडे कसा भोजनाला?’

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

मंडळी, सध्या महाराष्ट्रदेशी बंधुप्रेम भलते बहरले आहे. हे दोन बंधू परस्परांना टाळी देण्यासाठी हाळी देत आहेत. महाराष्ट्रापुढे आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, असा त्यांचा दावा आहे. ‘वास्तव में ट्रुथ’ असे आहे की विधानसभेत धोबीपछाड झाल्याने हे दोन बंधू ‘दीन बंधू’ झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर परस्परांची आठवण येऊन, ते हे गीत आळवत आहेत...

स्थळ - दादर-बांद्रा

चाल - तुझ्या गळा माझ्या गळा

गुंफू मोत्यांचा माळा...

‘तुझा गळा, माझा गळा

घालू आपण गळ्यात गळा’

‘दादा दाबशील का गळा?’

‘चल रे ‘राजा’ चहाटळा!’ ।। ध्रु।।

‘तुझी टाळी, माझी टाळी’ ‘

देऊ टाळीवर टाळी’

‘टाळी आणखी कोणाला?’ ‘

नको ‘कमळी’ला टाळी’

Raj Thackeray, Uddhav Thackeray

दादा तू मागच्या वेळी

टाळली होतीस टाळी

आपटलो मी तोंडावरी

आणू नकोस ती पाळी

नाही तसे आता होणार

टाळी मला कोण देणार?

उरला तूच मज रक्ताचा

‘राजा’ तूच कामी येणार

‘खुसू खुसू, गालि हसू’

‘वरवर अपुले रुसू रुसू’

‘चल मग युतीत नको बसू’

एकीने शत्रू गोटात घुसू’

‘कृष्णकुंजी’ आमरस-पुरी

बोलव ‘राजा’ या दादाला

वेड लागले त्या ‘भाई’ला

तुझ्याकडे कसा भोजनाला?’

‘शिंदे पगडी, मज चिरडी!

तू शेला देशी ‘गद्दारा’ला

नाद त्याला ‘कमळी’चा

लागू नकोस त्या नादाला’

‘नाते पुन्हा येवो रुळावरी

मशाल शोभे ‘इंजिना’ला

क्षुल्लक वाद ‘साईडिंग’ला

कवेत घेऊ महाराष्ट्राला’

‘सोड दादा ‘तुतारी-पंजा’ला

विझवी ते ‘मशाली’ला

येतो एकदा ‘मातोश्री’ला

बोलवू नकोस ‘भोंग्या’ला’

‘राजा’ची ‘आगीनगाडी’

व्यंगचित्र रेषा हवेत काढी

इंजिनाला डबे न जोडी

कधीच ना ‘स्टेशन’ सोडी

‘दादा खडूस नको बोलू

टोमणे तुझे किती झेलू

असे कसा वागतोस तू? ‘

बंधुप्रेम’ हे कसे पेलू?’ ‘

कशी कशी आज अशी

अट ती दादाची खाशी!’

‘घे कट्टी फू ‘कमळी’शी

तर मग गट्टी माझ्याशी?’

दादा येई का तू कामाला?

सोडवशील का ‘राजा’ला?

‘ईडी’ दिठीने प्राण कंठी

आणखि फास कशाला?’

भेटू कुठे सांग लवकरी

तुझ्या घरी, माझ्या घरी?

दादरला की बांद्र्याला

चर्चेस तोंड फोडुया तरी

ठरवताना ही रणनीती

अडवी येती नातिगोती

एका म्यानात बसतील का

तलवारीची दोन पाती?

‘एशिंसे’चा मोठाच जोर

होऊ त्यांच्यावर शिरजोर

घड्याळाचे काटे रोखुनि

पुरते करू त्यांना कमजोर

तुझे किती नि माझे किती

शिलेदारांची बदले स्थिती

झाले असतील अस्वस्थ

त्यांना अस्तित्वाची भीती

पारडे आपले होईल जड

‘महाशक्ती’ला डोईजड

दोघे मिळूनि भेदूयात

तोतया सेनेचा ‘ठाणे’गड

‘कमळ’ टाकी मोहपाश ‘

भुंगे’ त्यात अडके खास ‘

कमळा’मागे लावू भुंगा

हाच एक असेल ध्यास

द्यायची तेव्हा देऊ टाळी

आता देऊ नुसती हाळी

प्रेस लागे मागे-पुढे पळू

आपण त्यांना मग टाळू

राहून पाठमोरे आपण दोघे

टाळीचा फक्त खेळ खेळू

‘तुझा गळा, माझा गळा

घालू आपण गळ्यात गळा’ ‘

तुझी टाळी, माझी टाळी’

‘देऊ टाळीवर टाळी...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT