
काँग्रेसचे आजचे राजकारण आणि ते करणारे नवे नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित झालेले पाहायला मिळाले. शरद पवार यांच्यासकट देशातील दिग्गज नेत्याच्या तोंडून त्यांची प्रशंसा होत असते. सोनिया गांधी, राहुल गांधी, फारूक अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, लालूप्रसाद यादव आदी विरोधी नेत्यांनीही त्यांच्या राजकीय कौशल्याचे विशेष कौतुक केले. उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याचे कौशल्य आहे आणि येणाऱ्या काळात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांनी आणि प्रेरणेने आपली वाटचाल करणारी शिवसेना म्हणूनच इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी जाणवते. ती नक्कीच महाराष्ट्राला वेगळी दिशा देईल,
शिवसेना म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांनी ज्या उद्दिष्टांसाठी शिवसेनेची स्थापना केली आणि अविरतपणे ज्या हिंदू तसेच मराठी माणसासाठी ते लढत राहिले त्या विचारांना पुढे नेण्याचे कार्य आज जर खऱ्या अर्थाने कोणी करत असेल तर ते नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी मुंबई महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या आड कोणी येऊ नये म्हणून शिवसेनेची एक जबरदस्त तटबंदी निर्माण केली.
सुरुवातीला ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या मूलमंत्रावर पायवाट निर्माण करून इतिहास रचणारी शिवसेना पुढे महाराष्ट्र व देशाच्या राजकारणातील एक अविभाज्य राजकीय पक्ष बनली. बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी काँग्रेसला पाठिंबा देण्यापासून आणीबाणीचे समर्थन करण्याच्याही अनाकलनीय भूमिका घेतल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन उद्धव ठाकरे यांनीही भाजपने जेव्हा त्यांना राजकीय व्यवस्थेतून उखडण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकीय धोबीपछाड देत काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेचा डाव मांडला आणि भाजपला शिवसेनाच आव्हान देऊ शकते हे दाखवून दिले.
बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाला भूमिपुत्राला प्रथम न्याय हे आपल्या राजकारणाचे सूत्र ठेवल्यामुळे पुढे काँग्रेससोबत त्यांचे खटके अधिक उडू लागले. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला शिस्तपर्व म्हणणारे बाळासाहेब नंतर काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडून फेकण्यापर्यंतची टीका करू लागले. अर्थात त्यास कारण इंदिरा पर्व संपल्यानंतरचा कालावधी, राजीव गांधी आणि त्यानंतरचा कालावधी अशी अनेक कारणे होती. त्याच कालावधीत आधी जनता पक्ष आणि मग भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांचा राजकारणात वाढलेला वावर आणि इतर अनेक बाबी कारणीभूत होत्या.
भाजप महाराष्ट्रात प्रमोद महाजन नावाच्या व्यक्तीचे महत्व वाढले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विश्वासातील म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली. साहजिकच बाळासाहेबांना समजावण्याची ताकद प्रमोद महाजन यांच्याशिवाय इतर कोणांत नव्हती. त्यामुळे भाजप हिंदुत्व या मुद्द्यांवर शिवसेनेच्या जवळ आला आणि बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत झाला. बाळासाहेबांनीही हिंदुत्वासाठी भाजपसोबतच सतत राजकीय व्यूहरचना आखली आणि केंद्रात आणि राज्यात खऱ्या अर्थाने भगवा फडकावून दाखवला.
बाळासाहेबांच्या काळातही शिवसेनेत बंड घडली किंवा घडवून आणली. अगदी हेमचंद्र गुप्ते यांच्यापासून ते राज ठाकरे यांच्यापर्यंतचे बंड त्यांच्याच हयातीत घडले. या सगळ्यात शिवसेना निवडणुकीच्या राजकारणात वर किंवा खाली आली पण तिचा मूळ उद्देश कधी डोळ्यासमोरून किंवा मनातून ढळू दिला नाही. सत्ता हे केवळ समाजसेवेचे साधन आहे. सत्तेसाठी आपल्या मूळ विचारांना बगल द्यायची नाही हे शिवसेनेचे विचार कधी बदलले नाहीत. त्याचसोबत शिवसेनेला कधीही कोणी गृहीत धरू लागले किंवा कमी लेखू लागले तर त्यालाही त्याची जागा दाखवून देण्यासही शिवसेनेने मागचा पुढचा विचार केला नाही.
शिवसेनेला बंडाचा इतिहास आहे. १९६६ ते २०२५ या ५९ वर्षांच्या वाटचालीत शिवसेनेने अनेक बंड पाहिली. शिवसेना प्रत्येक वेळेस तावून सुलाखून निघाली. बंडखोरांना जनता विसरूनही गेली. शिवसेना मात्र नव्या ताकदीने उभी राहिली. हेमचंद्र गुप्ते यांच्यामुळे पहिल्या बंडाचा सामना शिवसेनेने केला. त्यानंतर १९९१ छगन भुजबळ यांच्या रूपाने दुसरी मोठी बंडाची ठिणगी पडली. मंडल आयोग आणि महात्मा फुले यांच्याविषयी अवमानकारक लिखाणाच्या विरोधात दुखावलेल्या भुजबळांनी शिवसेनेला हादरा दिला.
निवडून आलेल्या ५४ आमदारांपैकी १८ आमदारांना घेऊन त्यांनी जय महाराष्ट्र केला. भुजबळांनतर १९९९ मध्ये गणेश नाईक, २००५ मध्ये नारायण राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर २००६ मध्ये खुद्द राज ठाकरेंनी शिवसेना सोडत स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून स्वतंत्र राजकारण सुरू केले. त्यानंतर सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदे यांच्या रूपाने झाले. त्यांनी ४० आमदारांसह प्रतिस्पर्धी भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवले. या बंड केलेल्या सर्वांनी प्रस्थापित राजकीय पक्षांशी युती करून आपले अस्तित्व टिकविले आहे.
शिंदेंच्या बंडानंतर शिंदे गटाला धक्का देण्यासाठी कार्यकारिणी बैठकीत एकूण सहा प्रस्ताव पारित करण्यात आले. पहिला ठराव म्हणजे, उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख असतील. सद्यस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात येत आहेत.
दुसरा ठराव म्हणजे, शिवसेना आणि बाळासाहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या विलग करता येणार नाहीत आणि ते कोणीही करू शकणार नाही म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नाही. तिसरा ठराव म्हणजे, बेईमानी करणारांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. त्याच आधारे पुढे एकनाथ शिंदेंसह इतर बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
शिंदे यांच्या बंडानंतर काही दिवसांतच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे सांगण्यात आले. फडणवीस सरकारबाहेर राहतील, असेही सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तीन जुलै रोजी बहुमत चाचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं यश मिळवले.
शिंदे यांनी ज्या अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेना सोडली होती, भाजपने त्याच अजित पवार यांना शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळात दुसरे उपमुख्यमंत्रिपद तयार करून बसवले. या सगळ्या कालावधीत महाराष्ट्र मात्र दिल्लीश्वरांच्या हाताखालील हतबल राज्य बनले. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपयश आले आणि विधानसभा निवडणुकीत मात्र शिंदे यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणित महायुती सरकारने विविध लोकप्रिय घोषणांचा मारा मतदारांवर करत पुन्हा सत्ता मिळवली.
भाजपमध्ये शीर्षस्थ नेतृत्व बदलू लागल्यावर त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत कमालीचा बदल झाला. जनसामान्यांचा पक्ष अशी ख्याती असलेला भाजपच्या लेखी हिंदुत्व हे केवळ आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या पुरते मर्यादित झाले. याउलट शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक राहिले आणि तळागाळापर्यंत रुजले. भाजपने अनेक राजकीय पक्षांसोबत सरकारे स्थापली. ज्यामुळे त्यांचा अजेंडा केवळ सत्ताग्रहण इतकाच होता हे स्पष्ट झाले.
या उलट शिवसेना अगदी बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेनेने भाजपला नेहमी सन्मानाची जागा दिली. पूर्वीच्या भाजपच्या नेत्यांनी अगदी अटलजी अडवाणींपासून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ते अगदी नितीन गडकरींपर्यंत सगळ्यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले ते त्यामुळेच. मात्र भाजपच्या नवनियुक्त शीर्षस्थ नेत्यांनी भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेला दिलेला शब्द फिरवल्याने महाराष्ट्रात एक अपरिहार्य राजकीय उलथापालथ झाली आणि अचानक भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर संभ्रम आणि शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.
सुसंस्कृत, शालीन उध्दव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या त्यागाची परंपरा कायम ठेवली. राज्याचे प्रमुख म्हणून इतक्या मोठ्या पदाचा सहजतेने त्याग करताना त्यांचा त्याग हा भाजपच्या सत्तेच्या लालसेचा खरा चेहरा उघडा करुन गेला. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून गणना होऊनही त्याचा कोणताही अहंभाव उद्धव ठाकरे यांच्या वागण्याबोलण्यात कधीच जाणवला नाही. अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि भाजपने उभ्या केलेल्या अनैसर्गिक आपत्तींना सामोरे जात
मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. लोकशाहीत डोकी मोजण्याची परंपरा भाजपने कायम ठेवली. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो आणि अनपेक्षितपणे पद त्यागतो आहे हे उध्दव ठाकरेंचे विधान सामान्यांच्या काळजाचा ठाव घेणारे होते. त्यातून केवळ आणि केवळ उध्दव ठाकरेंच्या मनातील स्वच्छ, निरागस आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन अवघ्या देशाला घडले.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने दोन पावले पुढेच टाकली आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांतील अनुक्रमे ६३ आणि ५६ आमदार हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे निवडून आले तसेच मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महानगरपालिका गेल्या पाच वेळा उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात निवडून आणल्या. यावेळी महायुती सरकारच्या फसव्या घोषणामुळे शिवसेनेला केवळ २० आमदारच निवडून आणता आले पण येणाऱ्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला उत्तरोत्तर अधिक उंची गाठून देतील यात कोणतीही शंका नाही .
महाराष्ट्र आणि भूमिपुत्राचे हक्क यांच्या संरक्षणार्थ कायम रस्त्यावरचा लढा उभा करणार
शाखांचे जाळे पूर्ववत आणि मजबूत करण्याकडे विशेष लक्ष देणार
अल्पसंख्याक, हिंदी भाषकांसोबत दुजाभाव न करता त्यांना सोबत घेणार
मराठी भाषेचे प्रशिक्षणवर्ग घेणार, त्याला चांगला प्रतिसाद
मुंबईकरासाठी शाखा हक्काचा आधार होता. शाखा अधिक उपयुक्त, संवादी आणि आधुनिक करणार
ज्येष्ठ नागरिकांसोबत आहेतच ८० टक्के समाजकारणासाठी तरुण पिढी जोडली जावी यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून कार्यक्रम हाती घेणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारला घेण्यात रस नाही. पालिका लुटण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार
घराघरात शिवसैनिक असावा यासाठी शहरापासून ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क अभियान राबवणार
निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देणार. विशेष करुन महिला आणि युवती ही शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे. त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.