MNS On Aurangzeb News Sarkarnama
महाराष्ट्र

MNS On Aurangzeb Tomb News : राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; औरंगजेबाच्या कबरीवरची सजावट काढा!

After Raj Thackeray's speech, the Maharashtra Navnirman Sena (MNS) has sent a letter to the District Collector of Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीजवळील सजावट त्वरित काढावी तसेच यापुढे या कबरीवर कुठलाही सरकारी खर्च करू नये. सर्व शाळातील मुलांच्या शैक्षणिक सहली येथे काढण्याचे आदेश द्यावेत

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या आपल्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षांना खडसावले. तसेच ही कबर उखडून टाकण्याऐवजी मराठ्यांचे स्वराज्य संपवायला महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथेच गाडला हा इतिहास आजच्या पिढीला कळवा यासाठी त्या कबरीवर शैक्षणिक सहली काढाव्यात, तिथे असलेली सजावट काढून 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला' असा फलक लावावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळे पडसाद उमटत असतानाच मनसे मात्र कामाला लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात मराठी भाषाच चालली पाहिजे असा आग्रह धरा, राज यांच्या आवाहनानंतर मनसेने मराठी बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मुंबईच्या बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्यांना कानफटावले. त्यानंतर आता औरंगजेबाची कबर ज्या छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे आहे त्या संभाजीनगरात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन दिले.

औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीजवळील सजावट त्वरित काढावी तसेच यापुढे या कबरीवर कुठलाही सरकारी खर्च करू नये. सर्व शाळातील मुलांच्या शैक्षणिक सहली येथे काढण्याचे आदेश द्यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी केली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात 30 मार्च रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणाचा संदर्भ दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आमच्या संभाजी महाराजांना अमानुषपणे, क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार औरंगजेब नष्ट तर करू शकला नाही परंतु तो स्वत: इथे पवित्र भूमीत गाडला गेला. जो आमच्या धर्मावर उलटला होता, आमची मंदिरे पाडत होता, आमच्या आया बहि‍णींची अब्रू लुटत होता तो इथेच संपला, हा इतिहास आहे. अशा परिस्थितीत त्याच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती त्वरित काढून टाकण्यात यावी.

ती नुसती कबर दिसली पाहिजे, तिथे यापुढे कुठलाही सरकारी खर्च होता कामा नये जसे की रंगरंगोटी, दुरुस्ती बांधकाम, काहीच नको. इथे एक बोर्ड लावण्यात यावा 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला'. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सहली तेथे आयोजित करण्यात याव्यात. जेणेकरून आमच्या पुढील पिढीला आणि जगाला हे कळले पाहिजे की, आम्ही कुणाला गाडला आहे.

येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फुल, चादर चढवण्यास येईल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात केली आहे. आमच्या मागणीचा विचार करून यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या पत्रात नमूद केले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT