BJP Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या दोन जागांसाठी महायुतीमध्ये 'टफ फाइट'; 'या' चार दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा

Bjp Political News : छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघे लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर आता निवडणूक होणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : देशभरात येत्या काळात राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागांसाठी मतदान 3 सप्टेंबर रोजी होईल. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघे लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर आता निवडणूक होणार आहे. या जागेसाठी सध्या इच्छुकांत रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

एक जागा भाजपला (Bjp) तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षांत चुरस पाहावयास मिळणार आहे. भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), रासपचे नेते महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ व साताऱ्याचे नितीन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. (Rajya Sabha Election News)

परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढलेल्या रासपच्या महादेव जानकरांना महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांनी पराभवाचा धक्का दिला होता. याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी पण राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा दावा केला आहे. त्यासोबतच जालना मतदारसंघातून पराभूत झालेले केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव चर्चेत आहेत.

राज्यसभेचे सदस्य असलेले छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे अजित पवार गटाचे नितीन पाटील यांना निवडणूक लढता आली नव्हती. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना तयारी करण्यास सांगण्यात आले होते. ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघे लोकसभेवर निवडून गेल्याने दोघांनी नियमानुसार राजीनामा दिला आहे. लोकसभेच्या सदस्यत्वाची त्यांनी शपथ घेतली. यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे.

महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. यामुळे या जागांवर भाजपा कोणाला उमेदवारी देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. त्यापैकी ते एक जागा अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 14 ते 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 26 ऑगस्ट आहे. मतदान आणि मतमोजणी 3 सप्टेंबरला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT