Mumbai News : भाजपने राज्यसभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तीन नावे भाजपने दिली आहेत. चौथे नाव देण्यात आले नसल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापलेला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु पुन्हा एकदा ही नावे वेटिंगमध्येच राहिली आहेत. Rajya Sabha Election 2024
राज्यसभेच्या जागांसाठी येत्या महिना अखेर निवडणूक होणार आहे. यामध्ये राज्यातील सहा जागांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढल्याने मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांना डावलल्याची भावना निर्माण झालेली होती. जशीही विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणूक यायची तेव्हा त्यांच्या नावाची चर्चा व्हायची. अखेर भाजपकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन केले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर कोकणात फारशी चांगली स्थिती नसलेल्या काँग्रेसमध्ये कोणताही फार मोठा परिणाम झाला, तरीही आता विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची रणनीती भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे.