Pune News : भाजप नेत्या, माजी आमदार मेधा कुलकर्णी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, २०१९च्या निवडणुकीत भाजपने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली. ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने आणि बांधलेला हक्काचा मतदारसंघ गमावल्यामुळे कुलकर्णी नाराज होत्या. परंतू, त्यांना थेट राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी देऊन मतदारसंघापासून दूर केले. परिणामी चार वर्षांपासून मनातील खदखद त्यांनी जाहीर केल्याने पुणे भाजपमध्ये अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कुलकर्णींच्या राजयकीय वाटचालीत कुणी काटे पसरवले, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)
पुण्यात याकाळी भाजपची फारशी ताकद नव्हती. त्या काळात मेधाताईंचे नेतृत्व उभे राहिले. महापालिकेच्या राजकारणात त्या तीन टर्म नगरसेविका होत्या. या काळात आक्रमक नगरसेविका अशी ओळख त्यांनी निर्माण केली. पुढे विधानसभेच्या २०१४ मध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्र्यपणे लढल्याने कोथरूडमधून भाजपच्या तिकिटावर मेधाताई आमदार झाल्या. पण ही आमदारकी त्यांच्याकडे फार काळ राहिली नाही. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांनी पुण्याच्या राजकारणात उडी घेतली. मेधाताईंचा पत्ता कट करून भाजपनेही 'सेफ' कोथरुडमधून पाटलांना उमेदवारी दिली. ऐनवेळी 'रेडिमेड' मतदारसंघ भाजपने पाटलांना दिल्याने कुलकर्णींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
तिकीट कापल्यानंतर मेधा कुलकर्णींनी राज्यातील भाजप प्रमुख नेतेमंडळींना 'साईड कॉर्नर' करत थेट दिल्ली गाठली. तिथे भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींशी जवळीक वाढवत त्यांनी राष्ट्रीय राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. यानंतर त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यादरम्यान, कुलकर्णींच्या पुण्यातील हक्काच्या कोथरुड मतदारसंघातील मतदारसंघात २०२४ ला चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा आहे. पण याचवेळी माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मुरलीधर मोहोळ यांचा कोथरुड मतदारसंघातील 'इंटरेस्ट' मेधाताईंना खूपत नाही. तेथील मोहोळांचे कार्यालय २४ तास खुले असून ते अनेकांच्या नजरेत भरणारे असून ते मेधाताईंच्याही आहे.
एकेकाळी मेधा कुलकर्णी यांच्या निवडणूक प्रचारात आघाडीवर असणारे त्यांचे खंदे समर्थकही मोहोळ आणि पाटलांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे कुलकर्णी पक्षात एकाकी पडल्याचीही चर्चा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यातही कुलकर्णींना दूर ठेवण्यात आले. एकीकडे राष्ट्रीय राजकारणात 'मानाचे पान' मिळत असतानाच कुलकर्णींना स्थानिक पातळीवर मानासाठी झगडावे लागत आहे. आता चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे श्रेय लाटले गेल्याचा आरोप करत कुलकर्णी यांनी उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी पक्षांतर्गत गटबाजी उघड केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली जाहीर नाराजी व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळांना लक्ष्य केल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
मेधा कुलकर्णींचे आरोप काय ?
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला असेही कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा सवालही कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
....तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे
मध्यंतरी आदरणीय मोदी, अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्षपदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे अशा शब्दांत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी व्यक्त करतानाच स्थानिक नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.