Mumbai News : अखेर भाजपचे महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या घोषणेसाठी भाजपने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदीसक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर केलेल्या टीकेचा समाचार फडणवीस यांनी मंगळवार (ता. 1) घेतला. यावेळी फडणवीस यांनी, फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांची फॅक्टरी उद्धव ठाकरे यांची असल्याचा घणाघात केला.
राज्य शासनाने महाराष्ट्रातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी किंवा अन्य भाषा शिकण्यासंबंधीचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी असल्याची टीका केली होती. त्याला आज फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
फडणवीस यांनी, मुंबईचा चेहरा भाजपचं सरकार आल्यानंतर बदलला. पण तुम्ही मुंबई महानगरपालिकेला एका सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजून आजपर्यंत अंडी खात राहिलात. तर शेवटी एकदम अंडी खाण्याच्या नादात कोंबडी चिरण्याचं कामचं ठाकरेंनी केल्याची बोचरी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांची सुरू झालेली फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अद्याप थांबलेली नाही. याआधी लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीने त्यांनी यश मिळवलं. तसाच प्रकार विधानसभेला केला. मात्र तो आम्ही हाणून पाडला. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लागणार असून आता महाराष्ट्रापासून मुंबई तोडली जातेय असा फेक नरेटिव्ह तयार केला जातोय. पण खरी गोष्ट हीच आहे की हे कुणालाच शक्य नाही. असं करण कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला आहे.
हिंदीचा निर्णय आम्ही घेतला नसून तो ठाकरेंच्या कार्यकाळातला आहे. याबद्दल त्यांना आता लाजही वाटतं नसून आपणच करायचं, आपणच त्याला विरोध करायचा आणि आपणच जिंकलो म्हणून ते आज सांगत आहेत. देशात त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते राबण्यासाठी यांनीच समिती तयार केली. त्याच समितीचा अहवाल होता की पहिली ते बारावी हिंदी अनिवार्य करा. तोच अहवाल उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला. त्यावर उद्धव ठाकरेंची सही होती. पण आता ते नाकारत आहेत.
राज्यात मराठी सक्तिचीच असून आम्हाला हिंदीबरोबरच भारतातल्या प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. एकीकडे हिंदीचा विरोध करायचा आणि दुसरीकडे इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा असं आम्ही करत नाही. आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसून मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.