Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : राजू शेट्टींनी सवाल करताच बावनकुळेंची फोनाफोनी; सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा; मात्र पडीक जमिनीवरुन 'त्या' जमीनदारांना थेट इशारा

Maharashtra Agriculture Land Rules : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, शेतजमीन सलग तीन वर्षांहून अधिक काळ पडीक ठेवल्यास ती ताब्यात घेण्याबाबत कायदा लागू करण्याचा विचार आणि कडक अंमलबजावणीचे संकेत दिले होते.

Aslam Shanedivan

Maharashtra Farmers Relief News : राज्यातील काही मोठे व्यापारी आणि व्यावसायिक शेतकऱ्यांकडून शेकडो एकर शेतजमिनी खरेदी करून त्या पडीक ठेवत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अशा जमिनी तीन वर्षांहून अधिक काळ पडीक ठेवल्यास त्या शासनाच्या व्यवस्थापनाखाली आणण्याची तरतूद असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय आणि कृषी क्षेत्रात चर्चेला उधाण आले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही बावनकुळे यांच्या भूमिकेवर टीका केली होती. असा निर्णय घेतल्यास कोकणातील सर्व शेती जप्त करावी लागेल, असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच पूर्वी गोरे आणि इंग्रज होते, आता काळे आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या शोषणाची पद्धत तीच असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

बावनकुळे म्हणाले की, परवा केलेल्या माझ्या विधानाचा विपर्यास झाला किंवा काही लोकांनी गैरसमज निर्माण केला. राज्यात १९४८ चा कुळ कायदा लागू असून, या कायद्यातील कलम ६५ नुसार एखादी जमीन तीन वर्षे पडीक राहिल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली आणण्याची तरतूद आहे. मात्र, हा नियम स्वतः शेती करणाऱ्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी नाही. मूळ शेतकरी स्वतः जमीन कसत असेल, तर त्याची जमीन शासनाच्या व्यवस्थापनाखाली आणण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. अशा शेतकऱ्यांची जमीन जमा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या व्यवस्थापनाखाली आणल्या जाणार नाहीत. मात्र, काही मोठ्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा त्याहून अधिक जमीन खरेदी केली आहे. या जमिनींवर फार्महाऊस उभारण्यात आले आहेत; परंतु जमिनींचा शेतीसाठी कोणताही उपयोग केला जात नाही. अशा जमिनी शेतीच्या उपयोगात आणल्या पाहिजेत, ही सरकारची भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

या जमिनींवर चांगला पाऊस झाल्यानंतर शेती केली, तर कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच राष्ट्रीय उत्पन्न आणि जीडीपीमध्येही भर पडेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ती पडीक ठेवण्याऐवजी शेतीच्या उपयोगात आणावी, अशी सरकारची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१९४८ च्या कुळ कायद्यानुसार, मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खरेदी करून केवळ फार्महाऊस उभारणाऱ्या आणि जमिनी पडीक ठेवणाऱ्या व्यक्तींनी त्या शेतीयोग्य उपयोगात आणाव्यात, अशी आमची भूमिका आहे. राज्याला मोठ्या प्रमाणात जमीन पडीक राहणे परवडणारे नाही. हा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नसून, शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून लँड बँक तयार करणाऱ्यांसाठी आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टींच्या टीकेवर बावनकुळे काय म्हणाले?

राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी राजू शेट्टी साहेबांना फोन केला होता. त्यांच्याशी माझी चर्चा झाली असून, त्यांनाही माझे म्हणणे पटले आहे. हा कायदा मूळ शेतकऱ्यांसाठी नाही आणि त्याचा वापर सर्वसामान्य शेतकऱ्यांविरोधात केला जाणार नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या जमिनींचे व्यवस्थापन करणे, हे महसूल मंत्रालयाचे काम आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेणे हे मंत्रालयाचे काम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ज्यांनी शेकडो एकर जमिनी खरेदी करून त्या पडीक ठेवल्या आहेत, त्या जमिनींवर चारा आणि विविध पिकांचे उत्पादन होऊ शकते. त्यामुळे पुढील तीन वर्षांत अशा जमिनी शेतीच्या उपयोगाखाली आणाव्यात, अशी माझी संबंधितांना विनंती आहे. फार्महाऊस बांधले असेल तर त्याबाबत हरकत नाही; मात्र जमिनी पडीक ठेवू नका. माझ्या विधानाचा अर्थाचा अनर्थ करण्यात आला असून, जमिनी शेतीच्या उपयोगात आणाव्यात, एवढीच आमची सूचना असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते बावनकुळे?

नागपूर येथील कोराडीमध्ये २१ नोव्हेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही व्यापारी आणि व्यावसायिकांनी १००, २००, ४०० एकर अशा मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. मात्र, या जमिनी पडीक असल्याचे सांगितले होते. दुष्काळी परिस्थितीत जमीन पडीक ठेवावी लागली तर ते समजू शकते; पण चांगला पाऊस असतानाही जमीन पडीक ठेवता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. केवळ मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ती तशीच ठेवण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे सांगत, शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केल्यानंतर तिचा शेतीसाठी उपयोग केला नाही, तर तीन वर्षांच्या कालावधीनंतर ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली आणण्याची तरतूद असल्याचे त्यांनी म्हटले होते.

भविष्यातील नियोजनासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. मात्र, या जमिनी शेतीसाठी वापरल्या जात नाहीत. त्यामुळे चांगला पाऊस झाल्यास अशा जमिनी शेतीच्या उपयोगात आणाव्या लागतील, असे संकेत त्यांनी दिले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदेशीर जमीन खरेदी-विक्री व्यवहारांचीही सरकारने गंभीर दखल घेतली होती. शेतीची जमीन निवासी वापरासाठी नसताना तिचा निवासी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही बावनकुळे यांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT