Rohit Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर जोरदार चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सर्वांना कळकळीच आवाहन केलं आहे. रोहित पवारांनी सर्वांना हात जोडून विनंती देखील केली आहे. ट्विटद्वारे त्यांनी या मुद्द्यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…!
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते यावर चर्चा करण्याचं टाळत आहेत, अशा प्रकारच्या चर्चा किंवा त्याबाबत अजितदादा कोणाशीही बोललेले नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. पण दुसरीकडं शरद पवारांच्या गटाकडील जवळपास सर्वच नेते याबाबत सातत्यानं बोलत आहेत. अजित पवार हयात असताना ते दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याबाबत चर्चा करत होते आणि त्यासंदर्भात त्यांनी बैठकही घेतल्याचं सांगत आहेत. यासंदर्भातील बैठकीचा एक फोटोही त्यांनी सादर केला आहे. पण या बैठकीत अजित पवारांशिवाय त्यांच्या गटाचा एकही नेता हजर नव्हता पण दुसरीकडं शरद पवारांसह त्यांचे चार ते पाच नेते उपस्थित होते. त्यामुळं अजित पवार खरंच एकत्रिकरणासाठी इच्छुक होते का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.