Arvind Sawant Sarkarnama
महाराष्ट्र

Mohan Bhagwat Hindu-Muslim remarks : मोहन भागवतांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर अरविंद सावंतांचा थेट सवाल; म्हणाले, ‘अमेरिकेत बोलण्यापेक्षा...’

Arvind Sawant targets ruling alliance over Mohan Bhagwat's Hindu-Muslim remarks : अमरावतीतून सावंतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; योगी आदित्यनाथांसह महाराष्ट्रातील नेत्यांना ‘बौद्धिक’ देण्याचा टोला

Pradeep Pendhare

Arvind Sawant on Mohan Bhagwat statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम संबंधांवर केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

भारतामध्ये मुस्लिम (Muslim) असू नयेत, असे एखाद्या हिंदूला वाटत असेल तर तो खरा हिंदू नाही, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती दौऱ्यावर असलेल्या अरविंद सावंत यांनी भागवत यांनी अमेरिकेत भूमिका मांडण्याऐवजी महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय नेत्यांना याबाबत सांगावे, असा टोला लगावला.

मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना मी हात जोडून विनंती करतो की, अमेरिकेत बोलण्यापेक्षा इथे बोलावं. तुमचे मुख्यमंत्री आहेत ना, योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रातले भंपक नेते आहेत ना, त्यांना हे बौद्धिक द्या. अमेरिकेतील लोकांना त्याची गरज नाही, अशी टीका सावंत यांनी केली. पुढे बोलताना सावंत यांनी पंतप्रधानांपासून सुरुवात करावी लागेल. बोले जैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत सत्ताधारी पक्षांच्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केले.

यावेळी अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीवरही जोरदार टीका केली. “जी माणसं सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी कुठेही जाऊ शकतात, त्यांना कुठेही संवेदना नाही,” असा आरोप त्यांनी केला. ही टीका केवळ एकनाथ शिंदे यांच्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महायुतीवर असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. “हे एकनाथ शिंदेंपुरतेच नाही, तर संबंध महायुती तशीच आहे,” असे ते म्हणाले.

दिवसाची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाने करून खोटे बोलणाऱ्या राजकीय नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. “दिवसा उठल्याबरोबर प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घ्यायचे आणि खोटं बोलायचे,” अशी टीका सावंत यांनी केली.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतही अरविंद सावंत यांनी भूमिका मांडली. जरांगे पाटील यांना प्रत्येक वेळी उपोषणाला बसण्याची पाळी का येते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दाखले देण्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले असून ते मुंबईला येणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची मागणी यापूर्वीच केल्याचे सावंत यांनी सांगितले. तमिळनाडूमध्ये 67 टक्के आरक्षण आहे. महाराष्ट्रात 50 टक्के आहे. 17 टक्के वाढवली तर बाकीच्या छोट्या-छोट्या दुर्लक्षित आणि गरीब जातींना न्याय मिळेल, असे सावंत म्हणाले. या छोट्या आणि दुर्लक्षित जातींचा राजकारणातील आवाज दबला गेल्याचा दावाही त्यांनी केला.

जातीपातीत दुभंगून सत्तेचे राजकारण

महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना सावंत यांनी जातीय ध्रुवीकरणाचा आरोप केला. “महाराष्ट्रामध्ये जातीपातीत दुभंगून सत्तेची बाजू, राजकारण सुरू आहे. फक्त खुर्ची. तुम्ही लढत राहायचे,” असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी काळात मतदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचेही सावंत यांनी सांगितले. “आता मतदारांनी सावध व्हायला पाहिजे. खास करून लाडक्या बहिणींनी सावध व्हायला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मोहन भागवत यांचे हिंदू-मुस्लिम ऐक्याबाबतचे वक्तव्य आणि त्यावर अरविंद सावंत यांनी केलेली प्रतिक्रिया यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत सावंत यांनी थेट महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सत्ताधारी राजकारणावर निशाणा साधल्याने आगामी काळात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT