Anil Deshmukh and Sachin Waze
Anil Deshmukh and Sachin Waze Sarkarnama
महाराष्ट्र

'व्हॅलेंटाईन डे'ला वाझे देणार देशमुखांना धोका? स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी आखला प्लॅन

सरकारनामा ब्युरो

मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयारी दर्शवली असून त्याबाबतचे पत्रच त्याने ईडीला लिहिले आहे. या पत्रासंदर्भात ईडी १४ फेब्रुवारीला न्यायालयात आपले म्हणणे मांडणार आहे. माफीच्या साक्षीदारामुळे एक किंवा जास्त आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली तर संबंधित व्यक्तीची शिक्षा माफ करण्यासाठी किंवा शिक्षेत सवलत द्यावी अशा स्वरुपाची विनंती तपास अधिकारी न्यायालयात करू शकतात. (Sachin Waze Write a Letter to ED)

यापूर्वी चांदिवाल आयोगासमोर देखील सचिन वाझेने आपली साक्ष फिरवण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये देशमुखांनी मला वसुलीचे आदेश दिले होते आणि वसुल केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले, असा आरोप वाझेनी केला आहे. मात्र आयोगाने तो फेटाळून लावला होता. सचिन वाझेने उलट तपासणी दरम्यान चांदिवाल आयोगासमोर, अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले नसल्याचे सांगितले होते. पण आपण दबावापोटी देशमुखांच्या बाजूने साक्ष दिल्याचे वाझेने आयोगासमोर दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणासंदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. CRPC कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो, असे सचिन वाझेने पत्रात म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडीने दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी ईडी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर देखील १४ फेब्रुवारी सुनावणी होणार आहे. मात्र वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुख यांना जामिन मिळतो का हे पाहणं महत्वाचे आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या देशमुख आणि वाझे दोघेही कोठडीत असून चांदीवाल आयोगाकडून दोघांचीही चौकशी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT