Sadabhau Khot vs Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sadabhau Khot vs Rohit Pawar सत्तास्थापनेस विलंबावरून रोहित पवारांचा महायुतीला टोला, तर सदाभाऊचंही खास प्रत्युत्तर!

Sadabhau Khot to Sanjay Raut : जाणून घ्या, नेमकं कोण काय म्हणालं आहे? ; सदाभाऊंनी संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरही केला आहे पलटवार

Mayur Ratnaparkhe

Rohit Pawar Vs Mahayuti News : महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीमध्ये मंत्रिपदावरून अद्याप एकमत झाल्याचं दिसत नाही. शिवाय, मुख्यमंत्रिपदाचा चेहराही अधिकृतपणे घोषित केला गेलेला नाही. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. यावरून विरोधकांनी आता महायुतीला घेरण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी या पार्श्वभूमीवर महायुतीला एक्सवरील एका पोस्टद्वारे टोला लगावला आहे. ज्यास माजीमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकूणच आता सत्ता स्थापनेच्या मुद्य्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरू झाल्याचे दिसत आहे.

रोहित पवार काय म्हणाले आहेत ? -

''लग्न ठरलंय, मुलाला मुलगी पसंद आहे मुलीला मुलगा पसंद आहे, मात्र आता लग्नाच्या दिवशी मुहूर्तावर मुलगा लग्नास नकार देत आहे, कारण काय तर मंत्रिपदाच्या रुपात मिळणारा हुंडा मनासारखा मिळत नाही.. यात लग्नाला आलेले लोक (जनता) मात्र ताटकळत उभे आहे. दुसरं काय बोलणार!'' असा रोहित पवारांनी टोला लगावला आहे.

सदाभाऊ खोत यांनी दिलं प्रत्युत्तर -

''रोहितजी, आमचं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, आणि याद्याही तयार आहेत. यादी बनवताना देवेंद्रजींनी कोणालाही ताटकळत ठेवलेलं नाही. आता फक्त अक्षता टाकायची तारीख उरली आहे. तारीख जाहीर होताच तुम्हाला खास निमंत्रण पाठवू का, की आपण आपोआप हजर राहणार?'' अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे.

याशिवाय ''निवडणुकीनंतर 'मविआ'(MVA)ला सरकार बनवण्याची वेळ आली असती, तर विधानसभेची मुदत संपताच २६ नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावून पडद्यामागून महाशक्तीने सरकार चालवले असते. पण आज निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही. पण यांच्या खेळात राज्याचा मात्र खोळंबा होतोय याचं महायुतीला काहीही देणंघेणं नाही, हे दुर्दैवी आहे.'' रोहित पवारांनी असंही म्हटलेलं आहे.

तर संजय राऊत(Sanjay Raut) यांनी, ''एकनाथ शिंदे स्वत:च म्हणताय मी सगळ्यांचा लाडका भाऊ आहे. वेगळा निर्णय ते घेणार नाहीत, त्याला हिंमत लागते.'' असं म्हणत एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरही सदाभाऊ खोत यांना राऊतांवर पलटवार केला.

''संजयजी आपण 'धाडस' आणि 'वेगळे निर्णय' यावर भाष्य करणे म्हणजे विनोद वाटतो. जे स्वतःच्या पक्षातील फुटी रोखू शकले नाहीत, त्यांनी धाडसाचे धडे देऊ नयेत.शिंदे साहेबांनी लोकांचा मनातील आवाज ओळखत इतिहास घडवला, हेच खरे धाडस आहे. रोज सकाळी माईक वर येऊन बोलणे हे धाडस नसते राऊतजी अजूनही समजा.'' असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT