Mahayuti, MVA Sarakrnama
महाराष्ट्र

Sakal Survey 2024 News : मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे नव्हे तर ठाकरे- फडणवीसांचाच जास्त बोलबाला

Election poll survey 2024 : या सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्या या मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे.

Sachin Waghmare

CM Eknath Shinde News : सकाळ आणि साम टिव्हीच्या माध्यमातून 'कल महाराष्ट्राचा' या 288 मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला. राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा, विधानसभेवर महायुती झेंडा फडकवणार का, की महायुतीचीच सत्ता राहणार, मतदारांची कुठल्या राजकीय पक्षाला पसंती आहे, या व अशा अनेक प्रश्नांचा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आला. राज्याच्या 288 मतदारसंघातल्या सुमारे 84 हजार 529 मतदारांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला.

लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला असून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशात नागरिकांनी कल बदलत भाजपऐवजी (Bjp) एनडीए आघाडीचे सरकार आणले. देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार यावरून तर्क काढले जात आहेत. त्यासोबतच आता राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्नांचा आढावा घेणारा हा राज्यातील पहिला सर्व्हे आहे.

या सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्या या मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. त्यासोबतच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपण कोणाला पसंती द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानुसार मतदारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दोघांनाही 22.4 टक्के इतकी समान मतदारांनी पसंती दिली.

दुसरीकडे जून 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारला धक्का देत सत्तेत आलेले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 14.5 टक्के नागरीकांनी पसंती दर्शवली. या सर्व्हेमध्ये ते काहीसे बॅकफुटवर दिसत आहेत. त्यांच्या तुलनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरस दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदेंना फडणवीस, ठाकरेंच्या तुलनेत जवळपास 10 टक्के मतदारानी कमी पसंती दर्शवली असल्याचे या सर्व्हेमधून पुढे आले आहे.

या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या सर्व्हेत 6.8 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 5.3 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना 4.7 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 3.6 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.

इतर नेते मंडळीच्या तुलनेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांना सर्व्हेमध्ये 0.9 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. तर 4.8 टक्के मतदारांनी या नेते मंडळींच्या तुलनेत अन्य नेत्यांना पसंती दर्शवली आहे. त्यासोबतच सांगता येत नाही असे जवळपास 10.2 टक्के मतदारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT